नागपूर : ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार व माजी मंत्री शंकरराव गेडाम यांचे बुधवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ९५ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या गिरीपेठ येथील निवासस्थानाहून दुपारी १२ वाजता निघणार असून अंबाझरी स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात येईल. १९५२, १९५७, १९६२ आणि १९७२ असे २० वर्षे त्यांनी काटोल विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. १९७५-७६ या वर्षी वसंतराव नाईक यांच्या तर १९७७-७८ या वर्षात वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात अनुक्रमे अन्न व नागरी पुरवठा आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी काम केले. त्यांनी संघटनात्मक पातळीवरही काम केले होते. ते कट्टर विदर्भवादी होते. त्यांच्या निधनाने काँग्रेसने एक जुना जाणता नेता गमविला आहे. (प्रतिनिधी)
ज्येष्ठ विदर्भवादी हरपला
By admin | Published: November 06, 2014 3:57 AM