मुंबई - कौटुंबिक संबंधातून राज ठाकरेंची मी भेट आहे. राजकीय अर्थ काढू नका. युतीबाबत जो काही निर्णय घ्यायचा तो केंद्रातील नेतृत्व राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा, अमित शाह, देवेंद्र फडणवीस हे घेतील. मी प्रदेशाध्यक्ष म्हणून भाजपा कशी वाढेल हीच माझी जबाबदारी, युतीबाबत जी भूमिका असेल ते वरिष्ठ नेते घेतील असं सांगत भाजपा-मनसे युतीबाबत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सूतोवाच केले
महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपा-मनसेची जवळीक वाढू लागली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत भाजपा नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. आज नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज यांची भेट घेतली. या भेटीनंतर बावनकुळेंनी राज ठाकरेंवर स्तुतीसुमनं उधळली. ते म्हणाले की, राज ठाकरे नेहमीच हिंदुत्वाची बाजू मांडत आलेत. हिंदुत्वाचं रक्षण करत आलेत. त्यामुळे त्यांना भेटण्यात काही गैर नाही. हिंदुत्वाचं आणि महाराष्ट्राचं रक्षण करणाऱ्या नेतृत्वाला भेटण्यात काही अडचण नाही. आजच्या भेटीचा संबंध केवळ कौटुंबिक, राजकीय नाही. राज ठाकरे हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्र, हिंदुत्वाचं रक्षण करणारे अत्यंत प्रामाणिक, निष्ठावान नेते आहेत. फायटर आहेत असं त्यांनी म्हटलं.
जवळपास १ तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. मी राज ठाकरेंशी सदिच्छा भेट घेण्यासाठी आलो आहे. त्यामुळे त्याचा राजकीय अर्थ काढू नये. राज ठाकरे हे माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. आमचे कौटुंबिक संबंध आहेत. राज ठाकरे नेहमी आमच्या कौटुंबिक कार्यक्रमाला हजर राहिले आहेत. आमच्याशी वैचारिक साम्य असणाऱ्या नेतृत्वाशी मी प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून भेटतोय असं सांगत बावनकुळेंनी भाजपा-मनसे यांच्यात हिंदुत्व हा समान धागा असल्याचं एकप्रकारे स्पष्ट केले.
उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र उद्धव ठाकरे यांचं हिंदुत्व बेगडी असून कौटुंबिक प्रेमात ते सगळे विसरून गेलेत. उद्धव ठाकरे आता हिंदुत्ववादी नाहीत. मी २९ वर्षापासून भाजपाचं काम करतोय त्यामुळे सांगतो की, उद्धव ठाकरे आता हिंदुत्ववादी राहिले नाहीत. त्यांनी सारेकाही सोडून दिलंय. कौटुंबिक प्रेमात सगळं विसरले आहेत. हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कतृत्वाला बगल देऊन ते आपलं कार्य करतायेत. त्यांच्याबद्दल जास्त बोलता येत नाही. सध्या उद्धव ठाकरेंचे जे काही सुरू आहे ते गडबडलेल्या मनस्थितीत आहेत. त्यामुळे नेमकी त्यांची भूमिका कोणती हे कळत नाही असा चिमटा बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना काढला.