मुंबई : मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना उधाण आलेला असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी सायंकाळी शिवसेना नेत्यांची बैठक घेत चर्चा केली. महापौर बंगल्यात झालेल्या या बैठकीत संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारातील शिवसेनेचा समावेश, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक आदी मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे समजते. भाजपा-शिवसेनेच्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेच्या वाट्याला आणखी दोन मंत्रिपदे येतात. मंत्रिमंडळ विस्तारात या दोन्ही जागा भरल्या जाव्यात, अशी शिवसेनेची मागणी आहे. रविवारी झालेल्या बैठकीत मंत्रिपदाच्या संभाव्य दावेदारांच्या नावांवर चर्चा झाली. आ. निलम गोऱ्हे (विधान परिषद सदस्य), आ. गुलाबराव पाटील (जळगाव ग्रामीण), अर्जुन खोतकर(जालना), डॉ. सुजित मिणचेकर(हातकणंगले), राजेश क्षीरसागर(कोल्हापूर उत्तर) अशी पाच जणांची नावे आघाडीवर असून, गुलाबराव पाटील आणि अर्जुन खोतकर यांना संधी मिळण्याची शक्यता असल्याचे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले. पाटील आणि खोतकर यांनी विधिमंडळात भाजपावर केलेला हल्लाबोल आणि या दोन्ही नेत्यांना त्यांच्या ग्रामीण पार्श्वभूमीचा फायदा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भाजपासोबतच्या संबंधातील तणावाबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेषत: मंत्रिमंडळातील भाजपा मंत्र्यांकडून शिवसेनेच्या मंत्र्यांना दिली जाणारी वागणूकही यावेळी चर्चिली गेली. मंत्रिमंडळ विस्तार आणि भाजपासोबतच्या धोरणाबाबत अंतिम निर्णय घेण्याचे सर्वाधिकार यापूर्वीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात आले होते, मुख्यमंत्री लंडन दौऱ्यावरून आल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याशी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करण्याची शक्यता आहे. येत्या ५ डिसेंबरपासून उद्धव ठाकरे राज्यव्यापी दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याबाबतही यावेळी चर्चा झाली. येत्या १७ नोव्हेंबर रोजी बाळासाहेब ठाकरे यांचा तिसरा स्मृतिदिन असून, या दिवशीच्या कार्यक्रमांच्या तयारीचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य स्मारकासाच्या स्थळाबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.महापौर बंगल्यासह अन्य काही ठिकाणे स्मारकासाठी चर्चेत आहेत. उद्धव ठाकरे ज्या ठिकाणाला पसंती देतील तिथे स्मारक उभारले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
मंत्रिपदासाठी सेनेची पाच नावे चर्चेत
By admin | Published: November 16, 2015 3:35 AM