मुंबई - २०१९ च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यात राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजपात बिनसलं आणि उद्धव ठाकरेंनी थेट काँग्रेस राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली. गेल्या ५ वर्षात राज्यात अनेक राजकीय भूकंप घडले. त्यात आता पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते आणि उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी केलेल्या खळबळजनक दाव्यानंतर राज्यात चर्चेला उधाण आलं आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची मातोश्रीवर गुप्त भेट झाली असून या भेटीनंतर ठाकरे दिल्लीला गेले असा दावा त्यांनी केला आहे.
सिद्धार्थ मोकळे यांनी म्हटलं की, वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे २५ जुलैला रात्री २ वाजता ७ डी मोतीलाल मार्ग याठिकाणी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांना भेटले. त्यानंतर ५ ऑगस्ट रात्री १२ वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मातोश्री बंगल्यावर गेले. स्वत: गाडी चालवत एकटे गेले. २ तास ठाकरे-फडणवीस यांच्यात बैठक झाली. त्यानंतर ६ ऑगस्टला उद्धव ठाकरे हे दिल्लीला गेले. दिल्लीत जाताना सोबत कोण कोण होते, दिल्लीत कुणाच्या गाठीभेटी केल्या हे उद्धव ठाकरेंनी जनतेला सांगावे असं त्यांनी म्हटलं आहे.
त्याशिवाय आम्हाला जी माहिती मिळाली ती जनतेसमोर ठेवत आहोत, त्यामागचं कारण म्हणजे राज्यात आरक्षणवादी असलेल्या मतदारांना भाजपा आणि त्यांचे मित्रपक्ष हे आरक्षणविरोधी आहेत हे पक्कं माहिती आहे. मात्र या आरक्षणवादी मतदारांनी शिवसेना उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांना मतदान दिले आहे. महाराष्ट्रात गेल्या ५ वर्षातील घडामोडी पाहता जर काही उलटसुलट राजकीय घडामोडी पुन्हा घडल्या तर महाराष्ट्रातील आरक्षणवादी मतदारांची फसवणूक होऊ नये यासाठी ही माहिती आम्ही जनतेसमोर ठेवतोय असंही वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केले आहे.
राज्यात पुन्हा भूकंप?
महाराष्ट्रातील राजकारणात कधी काय घडेल याची कुणालाही कल्पना नाही. शिवसेना-भाजपा यांनी एकत्रितपणे २०१९ ची विधानसभा निवडणूक लढवली. मात्र मुख्यमंत्रिपदावरून हे दोन्ही पक्ष वेगळे झाले. त्यातूनच महाविकास आघाडी राज्यात अस्तित्वात आली. त्यानंतर राज्यातील २ प्रमुख प्रादेशिक पक्ष शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात फूट पडली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसला. मागील वेळी भाजपाचे २३ आणि शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले होते. परंतु यावेळी भाजपाचे ९, ठाकरेंच्या शिवसेनेचे ९ खासदार निवडून आले. तर काँग्रेसची संख्या १ वरून १३ आणि राष्ट्रवादीची संख्या ४ वरून ८ खासदारांची झाली. त्यामुळे मविआचा फायदा उद्धव ठाकरेंना होण्याऐवजी काँग्रेस-राष्ट्रवादीलाच झाल्याचं दिसून आले. त्यात वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आलेल्या या दाव्याने राज्याच्या राजकारणात पडद्यामागून काही घडतंय का अशीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.