मुंबई : गेल्या आठवड्यात ब्रेक्झिटच्या प्रभावामुळे गडगडलेल्या शेअर बाजारात गुरुवारी पुन्हा एकदा तेजीचे राज्य दिसून आले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी वाढीसह बंद झाला. सेन्सेक्स २५९.३३ अंकांनी अथवा 0.९७ टक्क्याने वाढून २६,९९९.७२ अंकांवर बंद झाला. गेल्या तीन सत्रांपासून सेन्सेक्स तेजीत आहे. या तीन सत्रांत सेन्सेक्स ३२४.६८ अंकांनी वाढला. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला निफ्टी ८,२८७.७५ अंकांवर बंद झाला. ८३.७५ अंकांची अथवा १.0२ टक्क्याची वाढ त्याने मिळविली. आशियाई बाजारांत तेजीचे वारे वाहिले. हाँगकाँगचा हँग सेंग १.७५ टक्क्यांनी, जपानचा निक्केई 0.0६ टक्क्याने वाढला. चीनचा शांघाय कंपोजिट मात्र 0.0७ टक्क्याने घसरला. युरोपीय बाजारांत सकाळी तेजीचे वातावरण होते. पॅरिसमधील बाजार 0.२७ टक्क्याची तेजी दर्शवीत होता. सेन्सेक्समधील ३0 पैकी २८ कंपन्यांचे समभाग वाढीसह बंद झाले. डॉ. रेड्डीजचा समभाग सर्वाधिक ३.३८ टक्क्यांनी वाढले. एनटीपीसीचा समभाग दुसऱ्या स्थानी राहिला. (प्रतिनिधी)
सेन्सेक्स वधारला!
By admin | Published: July 01, 2016 4:41 AM