मुंबई : विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, मेळघाट परिसर व अकोला आणि कोयना धरण परिसराला शनिवारी भूकंपाचे सौम्य धक्के बसले़ चंद्रपुरातील इंदिरा गांधी व कमला नेहरू मार्केटमधील इमारत एका बाजूला झुकली. तसेच शहरातील काही मोठ्या इमारती या धक्क्यामुळे हादरल्याचे रहिवाशांनी सांगितले. नागपुरात दुपारी ११.४५ च्या सुमारास अनेक भागांत विशेषत: फ्लॅटधारकांना भूकंपाचे धक्के जाणवले. उत्तर नागपुरातील पॉवर ग्रीड कार्यालयातील सायरन जोरात वाजला. लोकांनी विचारणा केली तेव्हा सायरन हा भूकंपाचा इशाराच असल्याचे सांगण्यात आले. चंद्रपूर येथे कस्तूरबा मार्गावरील इंदिरा गांधी मार्केट व कमला नेहरू मार्केट या तीनमजली जुळ्या इमारतीला हादरे बसले. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर, धारणी आणि अचलपूर तालुक्यातील परतवाडा येथे सौम्य धक्के जाणवले. मोर्शी येथील अपर वर्धाच्या भूकंपमापन यंत्रावर ५.५ रिश्टर स्केलची नोंद झाली. गोंदिया शहरातील काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के नागरिकांनी अनुभवले. अकोला शहराच्या गीतानगर व डाबकी रोड भागातही सकाळी ११़ ४०च्या सुमारे एक मिनिट भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. यामुळे एकच धावपळ उडाली.
विदर्भाला बसले सौम्य धक्के
By admin | Published: April 26, 2015 2:11 AM