काँग्रेस आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी 'मातोश्री'ने धाडलं खासगी विमान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2019 02:18 PM2019-09-01T14:18:04+5:302019-09-01T14:18:45+5:30
एखाद्या आमदाराला शिवसेनेत प्रवेश देण्यापूर्वी संपर्क प्रमुख, खासदार, तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांचा सल्ला घेतला जातो.
शिवाजी पवार
श्रीरामपूर : शिवसेना व भारतीय जनता पक्षातील नेते काँग्रेस व राष्ट्रवादीतील नेत्यांना प्रवेशासाठी पायघड्या टाकत आहेत. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी श्रीरामपूरचे काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांना पक्षात घेण्यापूर्वीच शाहीथाटात पाहूणचार केला. कांबळे यांचा राजीनामा विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांच्याकडे पुण्याला जाऊन सुपूर्द करण्यासाठी ठाकरे यांनी मुंबईतून खासगी चार्टर विमान दिले. त्यामुळे शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे व संपर्क प्रमुख आमदार नरेंद्र दराडे यांनाही धक्का बसला आहे.
रविवारी रात्री आमदार कांबळे यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, शिवसेना नेते सचिन बडधे हे कांबळे यांच्या समवेत उपस्थित होते. तत्पूर्वी त्यांनी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तेथे कांबळे यांच्या समवेत ठाकरे यांनी सुमारे अर्धा तास चर्चा केली. आठ दिवसांपूर्वी कांबळे यांच्याशी पक्षप्रवेश व उमेदवारी देण्यावर सविस्तर चर्चा झाली होती. माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचाीही या निर्णयामागे मोठी भूमिका राहिली. त्यानंतर रविवारी त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
एखाद्या आमदाराला शिवसेनेत प्रवेश देण्यापूर्वी संपर्क प्रमुख, खासदार, तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांचा सल्ला घेतला जातो. त्यांची मते जाणून घेतली जातात. श्रीरामपूरच्या बाबतीत कांबळे यांच्या प्रवेशाने मात्र अनेकांना धक्का बसला आहे. कारण खासदार सदाशिव लोखंडे यांचे चिरंजीव डॉ.चेतन हे स्वत: येथून उत्सुक होते. संपर्क प्रमुख आमदार दराडे हे सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव व येवला बाजार समितीचे माजी सभापती देविदास निकम यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते. मात्र आमदार कांबळे हे सर्वांवर भारी ठरले आहेत.
पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत: कांबळे यांना प्रवेश दिला. रविवारी मातोश्रीवर बैैठक आटोपल्यानंतर कांबळे यांचा काँग्रेसचा राजीनामा देण्याचे निश्चित झाले. मात्र विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे पुण्याला होते. तेथून ते चार दिवसांकरिता कामानिमित्त बाहेर जाणार असल्याचे समजले. त्यानंतर मात्र कमालच झाली. आमदार कांबळे यांना मुंबईतून रात्री सात वाजता पुण्याला बागडे यांच्याकडे रवाना करण्याचा निर्णय झाला. ठाकरे यांनी खासगी चार्टर विमान दिले. समवेत मिलिंद नार्वेकर यांनाही पाठविले. नार्वेकर, रावसाहेब खेवरे, सचिन बडधे हे आमदार कांबळे यांच्या समवेत पुण्याला आले. रात्री दहा वाजेच्या दरम्यान पुणे विमानतळावरच कांबळे यांनी बागडेंकडे राजीनामा सुपूर्द करत काँग्रेसला जय महाराष्ट्र केला. त्यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते.