मुंबई/सांगली - राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात नेहमीच आक्रमक भूमिका घेणारे भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक व्हिडीओ शेअर करत सांगलीमधील पोलीस अधिकाऱ्यांसह पालकमंत्री जयंत पाटील आणि पवार कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच रक्षकच जर भक्षक बनत असतील तर त्यांच्याकडून संरक्षण कशाला घ्यायचं. असा सवाल उपस्थित करत पडळकरांनी महाराष्ट्र पोलिसांचा अंगरक्षक नाकारला आहे.
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, पवार कुटुंबीय आणि सांगली एस पी हेच माझ्या हत्येच्या कटात सामील होते. असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. तसेच पडळकरांनी पोलीस ठाण्यासमोरील हल्ल्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, याबाबत आपली प्रतिक्रिया देताना शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये गोपीचंद पडळकर म्हणाले की, हा जो व्हिडीओ तुम्ही पाहत आहात तो ७ नोव्हेंबर २०२१ रोजी माझ्यावर झालेल्या हल्ल्याचा व्हिडीओ आहे. सदर हल्ला आटपाटी पोलीस चौकीच्या समोर झालेला आहे. तसेच आपल्याला या व्हिडीओमध्ये दिसेल की, हा हल्ला किती सुनियोजीत होता. माझी गाडी ज्या दिशेने येत होती. त्याच्या दुसऱ्या बाजूने दोनशे लोकांचा जमाव लाठ्या-काठ्यांसह उभा होता. पहिल्यांदा माझ्या गाडीवर दगड फेकायचे. मग माझ्या गाडीचा वेग कमी होताच भरधाव वेगाने ट्रक अंगावर घालायचा. नंतर जमावाकडून हल्ला करवून घ्यायचा,असा सुनियोजित हा कट आखला होता. आश्चर्याची बाब म्हणजे या सर्व हल्ल्याचं चित्रीकरण होताना पाहायला मिळत आहे. हा सगळा कट पोलिसांच्या संरक्षणात घडवून आणला जात होता. तसेच सदर घटना थांबविण्यापेक्षा पोलीस चित्रिकरणामध्ये मग्न असलेले दिसत होते.
दरम्यान, या हल्ल्याप्रकरणी पडळकरांनी जयंत पाटलांसह सांगलीतील पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, या हल्ल्याच्या कटात सांगली जिल्ह्याचे एसपी दीक्षितकुमार गेडाम, ॲडिशनल एसपी मनीषा डुबुले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील पूर्णपणे सहभागी आहेत. त्यानंतर यांनी या कारवाईच्या नावाखाली माझ्या बॅाडीगार्डलाच निलंबित केलं. तसेच माझ्यावरच कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल केला.
पोलिसांच्या या भूमिकेमुळे माझा एसपी आणि ॲडिशनल एसपी यांच्यावरील विश्वास उडाला आहे. त्यामुळे मी बॅाडीगार्ड न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. कारण रक्षकच जर भक्षकात सामील असतील तर त्यांच्यावरती कसा विश्वास ठेवायचा. पण एकच सांगतो की माझा माझा पवार-पाटलांविरूद्धचा लढा मी सुरू ठेवणार आहे, असे पडळकर म्हणाले.
दरम्यान, पडळकरांच्या या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिक्रिया आली आहे. गोपीचंद पडळकर यांनी केलेले आरोप हे पब्लिसिटी स्टंट आहेत. तसेच पवार कुटुंबीय तसेच जयंत पाटलांचं नाव घेऊन पडळकर देवेंद्र फडणवीस आणि अमित शाहा यांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना लगावला आहे.