अजित पवारांवर गंभीर आरोप; कागदपत्रे दाखवत जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 18:31 IST2025-01-03T18:24:57+5:302025-01-03T18:31:53+5:30
जितेंद्र आव्हाड यांनी सदर गाडीचे डिटेल्स आणि अजित पवारांच्या दौऱ्यावेळीचे फोटो प्रसारमाध्यमांना दाखवले.

अजित पवारांवर गंभीर आरोप; कागदपत्रे दाखवत जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल
NCP Jitendra Awhad: बीड खंडणी प्रकरणातील फरार आरोपी वाल्मीक कराड हा सीआयडी कार्यालयात ज्या गाडीतून हजर झाला तीच गाडी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मस्साजोग दौऱ्यावेळी त्यांच्या ताफ्यात होती, असा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केला होता. या आरोपात सत्यता असल्याचं सांगत आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आणि विधिमंडळ पक्षनेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेतून हल्लाबोल केला आहे.
"बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी वाल्मीक कराडच्या गाडीबाबत केलेल्या आरोपात तथ्य असल्याची आमची सगळ्यांची खात्री पटली आहे. कारण मी वाल्मीक कराड ज्या गाडीतून सीआयडी कार्यालयात शरण आला त्या गाडीचे सर्व डिटेल्स काढले आहेत. शिवलिंग मोराळे याची ही गाडी असून हा शिवलिंग मोराळे अजित पवार यांच्या मस्साजोग दौऱ्यावेळी त्यांच्या ताफ्यात होता," असा आरोप करत जितेंद्र आव्हाड यांनी सदर गाडीचे डिटेल्स आणि अजित पवारांच्या दौऱ्यावेळीचे फोटो प्रसारमाध्यमांना दाखवले.
दरम्यान, "अनेक आरोपींच्या कॉलरला धरून त्यांना पकडून आणणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांची वाल्मीक कराड प्रकरणामुळे प्रतिमा मलीन झाली. तो थाटात सीआयडी कार्यालयात हजर झाला, पण तोपर्यंत पोलिसांना त्याला पकडता आलं नाही," असा हल्लाबोलही आव्हाड यांनी केला आहे.
चौकशीचा फास आवळला
मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणासह खंडणी व मारहाण या तीन गुन्ह्यांचा तपास सीआयडी करत आहे, तर हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्वतंत्र उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना केली. हे पथक गुरुवारी सकाळीच केजमध्ये आले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची विश्रामगृहावर चौकशी केली. तसेच इतरही काही माहिती घेतली.
सुरक्षा वाढविली, कोठडीबाहेर आठ कर्मचारी
कराड हा सध्या बीड शहर ठाण्याच्या कोठडीत आहे. त्यामुळे या परिसरात आणि कोठडीबाहेर सुरक्षा तैनात केली आहे. एरव्ही तीन कर्मचारी आणि एक पर्यवेक्षण अंमलदार असायचा. परंतु, आता सहा कर्मचारी आणि पर्यवेक्षण अंमलदार असणार आहेत. या सर्वावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक पोलिस उपनिरीक्षक असेल. तसेच पोलिस निरीक्षक हे प्रत्येक तीन तासाला भेट देणार आहेत.