रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 04:27 PM2024-05-23T16:27:57+5:302024-05-23T16:28:19+5:30
कर्जत जामखेड येथे एमआयडीसी प्रकरणावरून सातत्याने तिथले स्थानिक आमदार रोहित पवार आग्रही मागणी करताना दिसतात. विधानसभेतही त्यांनी यावर आंदोलन केले होते. मात्र आता या प्रकरणी अजित पवार गटाने नवीन दावा करत या प्रकरणाची एसआयटी चौकशी लावण्याची मागणी केली आहे.
मुंबई - आमदार रोहित पवार सातत्याने कर्जत जामखेडमध्ये MIDC झाली पाहिजे यासाठी आग्रही आहेत. विधिमंडळातही त्यांनी यावर प्रश्न उचलले होते. स्थानिक बेरोजगार युवकांच्या हक्कांसाठी त्यांनी ही भूमिका घेतली हे सतत ते सांगत असतात. परंतु काही ठराविक उद्योगपती, व्यापाऱ्यांना लाभ व्हावा यासाठी अमुक गावातच MIDC साठी जमीन संपादित केली पाहिजे असा आग्रह रोहित पवारांकडून केला जातोय. याचा तपास केला असता त्यात फार मोठा भूखंड घोटाळा होत असल्याचा संशय आहे असा गंभीर आरोप अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केला आहे.
उमेश पाटील म्हणाले की, कर्जत जामखेडमध्ये पाटेगाव आणि खंडाळा इथं MIDC प्रस्तावित करण्यासाठी जवळपास १२०० एकर क्षेत्र संपादित केले जाणार आहे. त्याठिकाणी मूळ शेतकरी चांगल्या भावाने या जमिनी देण्यास तयार होतील. पण काही गावांचा यासाठी विरोधही आहे. परंतु त्याच जमिनीवर औद्योगिक वसाहत झाली पाहिजे असा रोहित पवारांचा आग्रह आहे. शेतकऱ्यांकडून कवडीमोल दराने ज्या व्यापाऱ्यांनी, उद्योजकांनी जमिनी खरेदी केल्या त्यांना या गोष्टीचा लाभ होणार आहे. मग या उद्योजकांना फायदा होण्यासाठी अट्टाहास चाललाय काय? असा सवाल त्यांनी केला.
तसेच देशाशी गद्दारी करून पळून गेलेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुन्हेगार नीरव मोदी याची सुद्धा जमीन जे क्षेत्र संपादित केले जाणार आहे तिथे आहे. नीरव मोदीला मोठ्या प्रमाणात मोबादला मिळवून देण्यासाठी कर्जत जामखेडच्या लोकांनी रोहित पवारांना निवडून दिलंय का?, संपादित क्षेत्रात कुणी जमिनी शेतकऱ्यांकडून विकत घेतल्या याची माहिती रोहित पवारांना आहे. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असतानाही त्याच गावात MIDC झाली पाहिजे याचा आग्रह आपण का धरताय याचा खुलासा करण्याची आवश्यकता आहे असं उमेश पाटलांनी म्हटलं.
दरम्यान, बेरोजगार तरुणांच्या नावाखाली रोहित पवार ज्याप्रकारे खोटं चित्र निर्माण करतायेत, जे कर्जत जामखेड नव्हे तर महाराष्ट्राला कळालं पाहिजे रोहित पवार हा फ्रॉड आहे. असली आणि नकलीमधला फरक लक्षात घेतला पाहिजे. रोहित पवारांचा खरा चेहरा उघड झाला आहे. या प्रकरणाची स्वतंत्रपणे एसआयटी नेमून चौकशी झाली पाहिजे. MIDC त्याच जागेवर प्रस्तावित व्हावी यासाठी उद्योगपतींनी लॉबिंग केलंय का? याबाबत अधिकृत पत्र संबंधित विभागांना आणि मंत्र्यांना देणार आहोत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केली आहे.