दिशा सालियन मृत्यूप्रकरणावरून राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज सभागृहामध्ये जोरदार रणकंदन झाले. दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंना लक्ष्य करत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करत सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गटाच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी एसआयटी चौकशीची घोषणा केली आहे. दरम्यान, या प्रकरणावरून सत्ताधारी आक्रमक झाल्यानंतर आदित्य ठाकरेंनीही सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारला थेट आव्हान दिले आहे. हवी ती चौकशी करायची आहे ती करा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका ३२ वर्षाच्या तरुणाला हे खोके सरकार घाबरले आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, माझ्या मुलीची बदनामी थांबवा अशी विनंती दिशा सालियनच्या आई-वडिलांनी करूनही तसेच मुलीची बदनामी न थांबल्यास आपण जगू शकणार नाही, अशी विनंती त्यांनी राष्ट्रपतींकडे केल्यानंतरही हा प्रकार थांबलेला नाही. उद्या सगळीकडे हेच दिसणार आहे. यापैकी अनेकाची तरुण मुलं मुली आहेत. मग हे लोक त्यांच्या मुला-मुलींची बदनामी सहन करू शकतील का? दु:खाची बाब म्हणजे एका घोटाळेबाज मुख्यमंत्र्याला वाचवण्यासाठी काही पातळी उरली नाही आहे का? आपल्या विधिमंडळात कधीही असले घानेरडे राजकारण झाले नव्हते. ते आज दिसत आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.
हवी ती चौकशी करायची आहे ती करा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका ३२ वर्षाच्या तरुणाला हे खोके सरकार घाबरले आहे. म्हणूनच बदनामीचे प्रयत्न होत आहे. आज हे घोटाळेबाज, गद्दार मुख्यमंत्री ज्या एका केसमध्ये सापडले आहे त्याबाबत सभागृहात बोलण्यापासून रोखण्यासाठी सगळे प्रयत्न सुरू आहेत. सत्ताधारी पक्ष हा सतत वेलमध्ये उतरत असल्याचे मी पहिल्यांदाच बघतोय. तसेच अध्यक्ष आणि तालिका अध्यक्ष हे आम्हाला बोलू देत नाही. गेल्या अडीच वर्षांत मी असं कधीही पाहिलं नव्हतं, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.