मुंबई - वडिलांच्या यकृत प्रत्यारोपणासाठी शासकीय दरबारी लोकशाही मार्गाने आर्थिक मदतीची मागणी करूनही दाद मिळत नसल्याने मंगेश साबळे नावाच्या तरुणाने बुधवारी औरंगाबादमध्ये टॉवरवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तर स्थानिक नेत्यांच्या विनंतीमुळे तो खाली आला. मात्र घडलेल्या या सर्व घटनेची माहिती मंगेशच्या वडीलांना मिळताच त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. तर आम्हाला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी फसवलं म्हणत ते ढसाढसा रडायला लागले.
मंगेशच्या वडिलांना यकृतचा आजार असून यकृत प्रत्यारोपण करावे लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यासाठी त्याने स्वत: यकृत देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी २० ते २५ लाखांचा खर्च असल्याने त्याने मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला, मात्र त्याच्या मागणीकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही. त्यापूर्वी त्याने राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन मदत करण्याची विनंती सुद्धा केली होती.
साबळे कुटंबानी केलेल्या आरोपात म्हंटले आहे की, गेल्या सहा महिन्यापासून मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळावी म्हणून हरिभाऊ बागडे यांच्याकडे मदतीसाठी पाठपुरवठा करत आहे. मदतीसाठी बागडे यांच्याकडे शिफारस पत्र मागितले असता त्यांनी दिले नाहीत. त्यांनी आमची फाईल मागून घेतली व पुण्याला एका हॉस्पिटलमध्ये पाठवले, मात्र डॉक्टरांना बागडे यांनी पैसे दिले नसल्याने आम्हाला परत यावा लागल्याचा आरोप मंगेशचे वडील यांनी केला आहे. यावेळी त्यांना रडू कोसळले.
तर गेल्या सहा महिन्यापासून बागडे यांच्याकडे खेट्या मारत असून वडिलांना माझे यकृत प्रत्यारोपणा करायचे असल्याने आमच्या दोघांच्याही चाचण्या कराव्या लागल्या, त्यासाठी जवळपास सहा लाख रुपये खर्च आले. मात्र आता त्या सर्व चाचण्या बेमुदत होतील. त्यामुळे बागडे यांनी केलेली दिरंगाई याला कारणीभूत असून त्यांनी आमची फसवणूक केली असल्याचा आरोप साबळे कुटुंबांनी केला आहे.
...आणि मंगेशला मिळाली मदत
मंगेश बाबतची माहिती मिळताच खासदार इम्तियाज जलील, अभिजित देशमुख यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. मंगेशची अवस्था पाहून देशमुख यांनी १ लाखाची तर इतरांनी मिळवून एकूण २ लाख ३१ हजारांची मदत गोळा करून दिली. तर आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करुन मंगेशविषयी माहिती दिली. त्यांनतर आरोग्यमंत्र्यांनी मंगेशच्या वडिलांवर उपचार करण्याचे आदेश संबधित प्रशासनाला दिले.