लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ज्या सन्माननीय व्यक्तीनी लॉकडाऊनचा निर्णय जाहीर केला त्यांचा आदर राखत सांगते की, केवळ २ तासांपूर्वी निर्णय घेऊन देशभरात लॉकडाऊन केल्याने लोकांना काय हालअपेष्टांना सामोरे जावे लागले याची त्यांना कल्पनाही नाही. कोणत्याही परिस्थितीचा आणि कुठल्याही लोकांचा विचार न करता अनेक लोक जिथे आहेत, ज्या परिस्थितीत आहेत, त्या जागी दिवसेंदिवस, महिनोन्महिने अडकून पडले. अचानक झालेल्या लॉकडाऊनमुळे एकाच ठिकाणी अडकून पडले असले तरी काही दिवसांत त्यांच्या बचती संपल्या आणि त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली, हे वास्तव आहे, असे ऋता आव्हाड यांनी सांगितले.
अनेकांकडे पैसा असूनही त्यांना हव्या त्या प्रमाणात वस्तू खरेदी करता आल्या नाहीत. त्या काळात प्राथमिकता असलेल्या औषध, मास्कसारख्या गोष्टींचा काळाबाजार झालाच, शिवाय अन्नधान्याचा साठा करून अनेकांनी गैरमार्गाने पैसा कमावला. कोविड काळात सरकारकडेही मोठ्या प्रमाणात निधी आला तरी त्यापैकी बहुतांशी रक्कम कोविड व्यवस्थापन व उपचारावर खर्च होत असल्याने त्यांनाही सढळ हाताने सगळ्यांना मदत करणे अशक्य झाले.
त्यानंतरच्या परिस्थितीतही निर्बंध कमी झाले तरी २ लसींची परवानगी आवश्यक असल्याने अद्यापही अनेक मजूर, कारागीर यांचे आयुष्य रुळावर आले नाही. लॉकडाऊनचा निर्णय व्यवस्थित विचार आणि व्यवस्थापन करून घेण्यात आला असता तर कदाचित ही परिस्थिती टाळता आली असती, असे त्या म्हणाल्या.