राज्य महिला आयोग धनंजय मुंडेंना नोटीस बजावणार आहे. पंकजा मुंडेंबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे धनंजय मुंडेंना नोटीस बजावण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात परळी विधानसभा मतदारसंघात वैयक्तिक पातळीवर टीका टीपण्णी करण्यात आल्याने गालबोट लागलं. धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंवर टीका करताना, पंकजा यांना बहिणबाई म्हटले. तसेच, आमच्या बहिणबाईंच्या शब्दाला किंमत आहे, कारण त्या गोपीनाथ मुंडेंच्या कन्या आहेत. तर, आम्ही पंडित आण्णांचे पुत्र असल्याने आमच्या शब्दाला कमी किंमत असल्याचे धनंजय यांनी म्हटले आहे.
सोशल मीडियावर धनंजय मुंडेंचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत धनंजय मुंडेंनी पंकजा यांच्याबाबत खालच्या शब्दात टीका केली होती. त्यामुळे पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी धनंजय मुंडेंच्या अटकेची मागणी करत पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला होता. त्यानंतर धनंजय मुंडेंविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. याबाबत राज्य महिला आयोगाकडेही धनंजय मुंडेविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून राज्य महिला आयोगाकडून याची गंभीर दखल घेतली जात आहे. याप्रकरणी लवकरच धनंजय मुंडेंना नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, शनिवारी माझ्या वक्तव्याबद्दल सोशल मीडियावर व्हायरल झालेली ती क्लिप एडिट करून, वक्तव्याचा विपर्यास करणारी आणि जाणीवपूर्वक माझी बदनामी करणारी आहे. ती क्लिप पूर्णपणे चुकीची असून त्याची सत्यता फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासावी, असे स्पष्टीकरण धनंजय मुंडेंनी दिलंय.