मुंबई: राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला जगण्याचा मुलभूत अधिकार दिला आहे़ त्यामुळे अपघातग्रस्त प्रवाशांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी सुरू करण्यात येणाऱ्या आपत्कालीन सेवा केंद्रांचा अधिभार प्रवाशांवर टाकू नका, असे उच्च न्यायालयाने मंगळवारी रेल्वेला बजावले़फूड प्लाझासाठी रेल्वेकडे जागा आहे़ मग सेवा केंद्रे सुरू करण्यासठी जागा का मिळत नाही़ तेव्हा प्रवाशांच्या जीवाशी न खेळता ही सेवा केंदे्र तात्काळ सुरू करावीत, असे आदेशही न्यायालयाने रेल्वेला दिले आहेत़ रेल्वे अपघातातील जखमींना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी रेल्वे स्थानकांजवळ रूग्णवाहिका व सेवा केंद्र सुरू करण्याचे आदेश न्यायालयाने रेल्वेला द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका समीर झवेरी यांनी केली आहे़ त्याची दखल घेत न्यायालयाने फटकारल्यानंतर रेल्वे व शासनाने काही रेल्वे स्थानकांजवळ रूग्णवाहिका उभ्या केल्या़या रूग्णवाहिकांचा आढावा घेण्यासाठी न्यायालयाने एका अधिकाऱ्याची नेमणूक केली़ या अधिकाऱ्याने यातील सर्वच रूग्णवाहिका अत्याधुनिक नसल्याचा अहवाल न्यायालयाला दिला़ त्यावर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली़त्याचवेळी झवेरी यांनी एका प्रवाशाला वेळेवर उपचार मिळाले नसल्याचे निदर्शनास आणले़ रेल्वेने सेवा केंद्राचा खर्च प्रवाशांकडून वसूल करणार असल्याचे सांगितले़ त्यास नकार देत न्यायालयाने वरील आदेश दिले व सुनावणी चार आठवड्यांसाठी तहकूब केली़ (प्रतिनिधी)
सेवा केंद्रांचा भार प्रवाशांवर नको
By admin | Published: December 24, 2014 2:45 AM