स्नेहा मोरे । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर महिन्याभरापूर्वी सुरू झालेल्या ‘वन रुपी क्लिनिक’ला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. आरोग्य सेवा क्षेत्रातील अवाजवी दरांमुळे त्रासलेले सामान्य नागरिक या क्लिनिककडे मोर्चा वळवित आहे. आता हीच आरोग्यसेवा मुंबईकरांना आणखी सहजगत्या उपलब्ध होणार आहे. पालिकेच्या दवाखान्यांतही लवकरच ‘वन रुपी क्लिनिक’च्या सेवेचा लाभ मिळणार आहे.आता भविष्यात ही सेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी पालिकेचे बंद असलेले किंवा ज्या दवाखान्यांत रिक्त जागा आहेत, त्या ठिकाणी आम्ही सेवा देण्यास तयार आहोत, जेणेकरून झोपडपट्ट्या आणि छोट्या वस्त्यांमध्ये सकाळी ९ ते सायंकाळी ४ पर्यंत सेवा देता येईल. त्याकरिता, या सेवेच्या परवानगी मिळण्याकरिता, मुंबई महापालिकेचे आयुक्त अजय मेहता यांना पत्र देण्यात येणार असल्याचेही डॉ. घुले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.मुंबईतील रेल्वे स्थानकांवर ‘वन रुपी क्लिनिक’ची सेवा सुरू झाल्यानंतर, तळागाळातील व्यक्तींनी या ठिकाणी गर्दी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे या सेवेचा विस्तार करीत हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आला. त्या क्रमांकावरही राज्याच्या कानाकोपऱ्यातून मदत मागणारे कॉल्स येत असल्याचे या क्लिनिकचे डॉ. राहुल घुले यांनी सांगितले. मागच्या आठवड्यात सुरू करण्यात आलेल्या वैद्यकीय चाचण्यांच्या सेवेलाही सकारात्मक प्रतिसाद असून, चाचण्यांसाठी दुरून रुग्ण या क्लिनिकमध्ये येत असल्याचे डॉ. घुले यांनी सांगितले. या वैद्यकीय चाचण्यांत ताप आणि थायरॉइच्या चाचण्यांसाठी अधिकाधिक व्यक्ती क्लिनिकमध्ये येत असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदविले आहे.अवघ्या महिन्याभरात या क्लिनिकच्या विविध सेंटर्सला सहा हजारांहून अधिक रुग्णांनी भेट दिली आहे. त्यात ३ हजार ८०० रुग्ण घाटकोपर, १ हजार ८०० रुग्ण कुर्ला, ७०० रुग्णांनी दादर येथे, तर ६०० रुग्णांनी वडाळा रोड येथील सेंटरला भेट दिली आहे, तसेच विशेष तपासणी मोहिमेत जवळपास ६०० हून अधिक महिलांची तपासणी करण्यात आली. जुलै महिन्यापासून ठाणे आणि वाशी येथेही ‘वन रुपी क्लिनिक’ सुरू होणार आहे. शिवाय, आणखी महत्त्वाचे म्हणजे, मध्य रेल्वेप्रमाणेच पश्चिम रेल्वे मार्गावरही ही सेवा सुरू करण्यासाठी संबंधितांशी बोलणे सुरू असल्याचे डॉ. घुले यांनी सांगितले.>महाराष्ट्रातही होणार विस्तार, दौंडमधून पत्रराज्याच्या विविध भागांतून या सेवेकरिता कॉल्स येत आहेत. त्याचप्रमाणे, दौंड येथे ‘वन रुपी’ची सेवा सुरू करावी, अशा संदेशाचे पत्रही आल्याचे डॉ. घुले यांनी सांगितले. त्यामुळे भविष्यात ही सेवा महाराष्ट्रभर विस्तारित करण्याविषयी विचार करत असून, त्याविषयी अभ्यास करण्यास सुरुवात झाल्याची माहिती दिली.
महापालिकेच्या दवाखान्यांतही ‘वन रुपी’ची सेवा
By admin | Published: June 06, 2017 2:09 AM