मुंबई : सर्वसामान्य प्रवाशांसाठी लांब पल्ल्याच्या रात्रीच्या प्रवासासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि अधिक सुखसोईंनीयुक्त अशा विना वातनुकूलित (नॉन एसी) शयनयान (स्लीपर सीटर) व्यवस्था असलेल्या नवीन बसचे लोकार्पण मंगळवारी परळ बस स्थानकात करण्यात आले. विशेष म्हणजे सर्वसामान्य प्रवाशांच्या हस्ते आणि एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व संचालक रणजीत सिंह देओल यांच्या प्रमुख उपस्थितीत परळ बस आगारातून परेल-भटवाडी (पाटगांव) ही बस सोडून लोकार्पण करण्यात आले.एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या मागणीनुसार सद्यस्थितीत साध्या, जलद, रातराणी, हिरकणी, वातानुकूलित शिवशाही, शिवनेरी, अश्वमेध अशा विविध बससेवा सुरू आहेत. या सेवेंतर्गत दररोज सरासरी ६७ लाख प्रवाशांना सेवा पुरविली जाते. या सेवेत आता रात्रीचा लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी रातराणी असलेली शयनयान बससेवा सुरू करण्यात आली आहे.रात्रीचा लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी प्रवाशी शयन बसेसला प्राधान्य देतात, तसेच मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी प्रवाशांना पुश बॅक आसन व्यवस्था उपयुक्त ठरते. या दोन्ही गरजांचा विचार करून एसटी महामंडळाने ३० पुश बॅक आसने आणि १५ प्रशस्त शयन (बर्थ) असलेली बससेवा सुरू केली आहे. या बसचे तिकीट दर (शयन-आसन या दोन्हीसाठी) सध्याच्या निमआराम म्हणजे हिरकणी बसच्या तिकीट दराइतकेच असतील, असे सांगण्यात आले आहे. लोकर्पण सोहळ्याला राहुल तोरो (महाव्यवस्थापक वाहतूक), रघुनाथ कांबळे (महाव्यवस्थापक यंत्र), संजय सुपेकर(उपमहाव्यवस्थापक वाहतूक) यांच्यासह एसटीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.नव्या शयनयान बसची वैशिष्ट्येही बस १२ मीटर लांबीची असून मजबूत अशा माइल्ड स्टीलची बांधणी आहे. त्यामुळे या वाहनामध्ये प्रवाशांना पुरेशी जागा उपलब्ध आहे.लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी या बसमध्ये ३० आरामदायी पुश बॅक आसने व १५ शयन (बर्थ) आहेत.पुढील आणि मागील बाजूस एलईडी मार्गफलक आहेत.चालक केबिनमध्ये अनाउन्सिंग सिस्टीम आहे, तसेच आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना सावध करण्यासाठी बल्कहेड पार्टीशनर हूटर असून, त्याचे बटण चालक कक्षात देण्यात आले आहे.पाठीमागील बाजूस एक रिव्हर्सिंग कॅमेरा बसविलेला असून, त्याची एलईडी स्क्रीन चालक कक्षात आहे.प्रत्येक बर्थमध्ये मोबाइल चार्जिंग सुविधा दिलेली असून, मोबइल ठेवण्यासाठी पाउच आहे, तसेच मॅगझीन पाउच व पाण्याची बाटली ठेवण्यासाठी ब्रॅकेटची सुविधा देण्यात आली आहे. पर्स अडकिवण्यासाठीही हुक आहे.
एसटीची विनावातानुकूलित शयनयान प्रवाशांच्या सेवेत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 3:15 AM