संजय नेवे,विक्रमगड- हातात झाडू, फावडे, घमेले, कोयता घेऊन श्री सदस्यांनी विक्रमगड तालुक्यात स्वच्छता मोहिम राबविली. तिने तालुक्याचा चेहरा-मोहराच चकाचकीत केला. गावागावातील रस्ते, गल्ल्या, पाणवठा, शाळा, शासकीय कार्यालय इत्यादी ठिकाणांची साफसफाई केली. तसेच येथील नागरिकांनी स्वच्छतेबाबतची आपली उदासीनता दूर करावी असा संदेश दिला. तसेच आपण आपले घर जसे स्वच्छ ठेवतो त्याप्रमाणे परिसरही स्वच्छ ठेवा असे ही आवाहन त्यांनी केले.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हे एक सेवादायी समाजाभिमुख उपक्रम राबविणारे असून डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंती निमित्त या स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रतिष्ठानच्या सेवेकऱ्यांनी फुटपाथवर साचलेले कचऱ्यांचे ढिगारे, गटारात साचलेली घाण इत्यादींची स्वच्छता केली. गावागावातील रस्त्यामध्ये पडलेले खड्डे सिमेंट काँक्रीटने भरून काढले. प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित स्वच्छता मोहीमेमध्ये संबंधित राजकीय व शासकिय कर्मचाऱ्यांसहीत ग्रा.पं. चे सरपंच, पोलीस पाटील, ग्रा.पं. सदस्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते. तसेच कचरा उचलण्यासाठी ट्रॅक्टर, टेम्पो, पॉवर टीलर ठेवण्यात आले होते. जमा केलेला संपूर्ण कचरा डंम्पींग ग्राऊंडमध्ये टाकण्यात आला.आदरणीय डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतातील सर्वात भव्य स्वच्छता संदेश अभियानात ८५ पेक्षा जास्त शहरामध्ये ३ लाखा पेक्षा जास्त नागरिकांचा सहभाग असलेले देशातील सर्वात मोठे स्वच्छता अभियान या अभियानाला प्रोत्साहित करण्यासाठी त्यांच्या आदेशाने संपूर्ण विक्र मगड तालुक्यात सकाळी ७ वाजल्या पासून स्वच्छता मोहीमेला सुरूवात करण्यात आली.
सेवेकऱ्यांनी केले विक्रमगड चकाचक
By admin | Published: March 03, 2017 3:15 AM