४ जानेवारीपर्यंत वाढवा : विरोधकांची मागणी नागपूर : हिवाळी अधिवेशन २४ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला अधिवेशनाचे सूप वाजेल. संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी या संदर्भातील ठराव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडला व तो मंजूर करण्यात आला. दरम्यान, अधिवेशन ४ जानेवारीपर्यंत वाढविण्याची मागणी विरोधकांनी केली. बापट यांनी मांडलेल्या ठरावावर जयंत पाटील म्हणाले, आता तर विदर्भाचे मुख्यमंत्री आहेत. ते विरोधी पक्षात असताना चार आठवड्यांचे अधिवेशन घेण्याची मागणी सातत्याने करायचे. त्यामुळे आता किमान ४ जानेवारीपर्यंत अधिवेशन चालवा, पळ काढू नका, असा चिमटा त्यांनी काढला. यावर संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सर्व पक्षांच्या प्रतिनिधींनी मिळून या ठरावाला मान्यता दिली असल्याचे सांगितले. अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी गटनेत्यांच्या निर्णयाचा आदर करा, अशी सूचना केली. संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी दुपारच्या सत्रात अधिवेशनाचा कार्यकाळ २४ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात येत असल्याबाबत विधान परिषदेत निवेदन केले. लगेच विरोधी पक्षाच्या सदस्यांनी एक महिना अधिवेशन चालावे, अशी मागणी केली. सरकार विदर्भाबाबत गंभीर नाही हेच यावरून दिसून येते, असा आरोपही त्यांनी केला. एकनाथ खडसे यांनी लगेच त्याला तयारी दर्शविली. गिरीश बापट यांनीही विरोधकांची फिरकी घेतली. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय सदस्यांचा समावेश असतो. बैठकीत त्यांनी व्यक्त केलेली मते ही सार्वजनिक करायची नसते. पण विरोधकांना ती जाणून घ्यायची असेल तर त्यांनी त्यांच्या गटनेत्यांना ते विचारू शकतात, असे ते म्हणाले. त्यानंतर विरोधकांचा विरोध मावळला.
अधिवेशन २४ डिसेंबरपर्यंत
By admin | Published: December 19, 2014 12:43 AM