राजीनाम्याबाबत अजित पवारांच्या नव्या वक्तव्याने धनंजय मुंडेंची कोंडी; नेमकं काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 10:50 IST2025-02-17T10:50:14+5:302025-02-17T10:50:50+5:30
अजित पवारांच्या या नव्या वक्तव्याने धनंजय मुंडेंची राजकीय कोंडी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राजीनाम्याबाबत अजित पवारांच्या नव्या वक्तव्याने धनंजय मुंडेंची कोंडी; नेमकं काय म्हणाले?
NCP Ajit Pawar: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा थेट संबंध अद्याप आढळलेला नाही, असा दावा ते करतात. मात्र, यापूर्वी अनेक प्रकरणात आरोप झाल्यानंतर माझ्यासह अनेकांनी नैतिकता म्हणून राजीनामा दिला होता, याची आठवण करून देतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नैतिकता म्हणून मुंडे यांनी राजीनामा द्यावा किंवा देऊ नये याबाबत त्यांनाच विचारा असं मत नाशिकमध्ये बोलताना व्यक्त केलं आणि राजीनाम्याचा चेंडू मुंडे यांच्याच कार्टात टोलवला. अजित पवारांच्या या नव्या वक्तव्याने धनंजय मुंडेंची राजकीय कोंडी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बीडमधील अत्यंत निंदनीय काळिमा फासणारी आहे, जे कोणी दोषी असतील त्यांना पाठीशी घातले जाणार नाही असे सांगून या प्रकरणात एसआयटी, सीआयडी, न्यायालयीन चौकशी केली एवढ्या एजन्सी नेमल्या आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी देखील दोषींवर कारवाई होईलच असे सांगितलं आहे, अजित पवार म्हणाले. आपल्यावर २०१० मध्ये जलसंपदामंत्री असताना घोटाळ्याचा आरोप झाला. त्यावेळी आपण राजीनामा दिला तसे अनेकांनी राजीनामे दिले आहेत. केवळ रेल्वे अपघात झाला म्हणून लालबहादूर शास्त्री यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर अनेक अपघात झाले; परंतु रेल्वे मंत्र्यांनी राजीनामे दिले का, असे सांगत त्यांनी अनेक प्रकरणात अनेकांनी राजीनामे दिले आहेत याचे स्मरण करून दिले.
धनंजय मुंडे यांच्याबाबत बोलताना मात्र, त्यांनी ते महाराष्ट्रात काय चालले आहे, हे ते पाहत आहेत, त्यांनाच यासंदर्भात प्रश्न विचारा, असे ते म्हणाले. सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीबाबत देखील त्या दोघांना माहीत, असे अजित पवार म्हणाले. लाडकी बहीण योजनेच्या निकषांनुसार पुढील हप्ते लाभार्थीना दिले जातील. नाशिक- पुणे रेल्वे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून मार्गात काही बदल करण्याच्या सूचना आहेत.
भुजबळ अनुपस्थित
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या दौऱ्यात पक्षाचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ मात्र अनुपस्थित होते. पक्षात प्रत्येक जण आपल्या कामात असतात. मी कोर्ट इमारतीच्या उद्दघाटनासाठी आलो आहे. निमंत्रण पत्रिकेत कोणाला बोलवावे आणि कोणाचे नाव नाही हे सांगू शकत नसल्याचेही पवार म्हणाले.