धनंजय मुंडेंची डोकेदुखी वाढली; महायुतीतील मंत्र्यानेच केली राजीनाम्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 17:49 IST2025-03-02T17:49:47+5:302025-03-02T17:49:47+5:30

महाविकास आघाडीतील विविध नेत्यांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना महायुतीतूनही असाच सूर आळवला जात आहे.

Set back fro ncp leader Dhananjay Munde minister in the Grand Alliance demanded his resignation | धनंजय मुंडेंची डोकेदुखी वाढली; महायुतीतील मंत्र्यानेच केली राजीनाम्याची मागणी

धनंजय मुंडेंची डोकेदुखी वाढली; महायुतीतील मंत्र्यानेच केली राजीनाम्याची मागणी

NCP Dhananjay Munde: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सीआयडीने कोर्टात आरोपपत्र दाखल करत वाल्मीक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचं स्पष्ट केलं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. कारण वाल्मीक कराड हा मुंडे यांचा अत्यंत निकटवर्तीय होता. स्वत: मुंडेंनीही जाहीरपणे तशी कबुली दिलेली आहे. महाविकास आघाडीतील विविध नेत्यांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना महायुतीतील घटकपक्ष असलेल्या आरपीआयचे (ए) अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही या मागणीचा पुनरुच्चार केला आहे.

"धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांचा जवळचा संबंध होता. त्यामुळे धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, ही मागणी आहे. अजितदादांनी यावर विचार करणं गरजेचं आहे. खुनाच्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा संबंध नाही. परंतु या प्रकरणातील आरोपी त्यांच्या जवळचा आहे. त्यामुळे नीतीमत्तेच्या आधारावर त्यांनी राजीनामा द्यायला हवा," अशी भूमिका रामदास आठवले यांनी मांडली आहे.

दरम्यान, रामदास आठवले यांनी धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी लिहिलेल्या पोस्टवरही प्रतिक्रिया दिली आहे. "करुणा मुंडे व धनंजय मुंडे यांचे काय संबंध आहेत हे सगळ्यांना माहीत आहे. करुणा मुंडे यांना धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती मिळाली असेल तर मला त्याबद्दल माहिती नाही. पण एक गोष्ट खरी आहे की, वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुख यांची हत्या केल्याची सगळी माहिती सीआयडीला मिळाली," असं आठवले यांनी म्हटलं आहे.

करुणा मुंडेंच्या पोस्टने खळबळ 

करूणा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करून मोठा दावा केला आहे. मंत्री धनंजय मुंडे हे उद्या ३ मार्च रोजी राजीनामा देतील अशी पोस्ट करूणा मुंडे यांनी केली आहे. याबाबत माध्यमाशी करूणा मुंडे यांनी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, "अजित पवारांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला आहे. २ दिवसांआधीच हा राजीनामा अजितदादांनी घेतला आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्याचं अजित पवार स्वत: जाहीर करतील. मला ही माहिती मिळाली असून १०० टक्के उद्या अधिवेशनापूर्वी ते जाहीर करणार आहेत," असा दावा करुणा मुंडेंनी केला आहे.

Web Title: Set back fro ncp leader Dhananjay Munde minister in the Grand Alliance demanded his resignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.