पुणे: सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या सेट परीक्षेचा निकाल येत्या शुक्रवारी (दि.११) जाहीर केला जाणार आहे. विद्यापीठ प्रशासनाने निकाल प्रसिध्द करण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे.त्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून निकालाची वाट पाहणा-या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे.विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यार्थ्यांची सेट परीक्षा २३ जून २०१९ रोजी घेण्यात आली. या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ७९ हजार ८७९ विद्यार्थी परीक्षेस उपस्थित होते. तर २२ हजार ६९५ विद्यार्थी परीक्षेस अनुपस्थित होते. युजीसीच्या नियमावलीनुसार परीक्षा झाल्यानंतर सर्व विषयांची उत्तर सुची जाहीर करण्यात आली. विद्यार्थ्यांकडून या उत्तर सुचीवरील हरकती मागविण्यात आल्या. सेट विभागाकडे नियोजित कालावधीत विद्यार्थ्यांकडून प्राप्त झालेल्या हरकती तज्ज्ञ समिती समोर ठेवण्यात आल्या.दरम्यान विद्यापीठाने सेट परीक्षेचा सर्व निकाल तयार केला.मात्र,युजीसीच्या समितीकडून निकाल मंजूरीचे काम पूर्ण झाले नव्हते.परंतु,युजीसीच्या समितीने निकाल जाहीर करण्यास नुकतीच मान्यता दिली आहे. त्यामुळे निकालाची वाट पाहणा-या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपणार आहे.सेट परीक्षेचा निकाल ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होईल,असे विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते.त्यानुसार येत्या शुक्रवारी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर केला जाणार आहे.--------------सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या २३ जून रोजीच्या सेट परीक्षेस ७९ हजाराहून अधिक विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.विद्यापीठ प्रशासनाने सेट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यापूर्वी आवश्यक असलेली सर्व प्रक्रिया नुकतीच पूर्ण केली.त्यामुळे येत्या शुक्रवारी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर सेट परीक्षेचा निकाल प्रसिध्द केला जाणार आहे.- डॉ.प्रफुल्ल पवार,कुलसचिव,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षेचा निकाल शुक्रवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 3:42 PM
विद्यापीठ प्रशासनाने निकाल प्रसिध्द करण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे
ठळक मुद्देयेत्या शुक्रवारी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर केला जाणार