वसई : विरार शहर परिसरातील धोकादायक अवस्थेत असलेल्या ट्रान्सफॉर्मरला सेफ्टी बॉक्स बसविण्यासंदर्भात त्वरित बैठक घेऊन संपूर्ण समस्या मार्गी लावाव्या व अंतिम कारवाई करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास सादर करावा, असे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्य अभियंता, कल्याण महावितरण यांना दिले आहेत. महावितरणाचा बेजबाबदार कारभार आणि अक्षम्य दिरंगाईमुळे उघड्यावर धोकादायक अवस्थेत असलेल्या ट्रान्सफॉर्मरमुळे (रोहित्र) निष्पाप नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात नुकतेच नालासोपारा पूर्वेकडील संतोष भुवन येथे एका अल्पवयीन निष्पाप मुलीचा शॉक लागून मृत्यू झाला. तसेच नालासोपारा पूर्वेकडील मोरेगाव, प्रगतीनगर, ओस्तवालनगरी, अलकापुरी, टाकी रॉड, विजयनगर या व इतर विविध ठिकाणी महावितरणकडून बसवण्यात आलेले ट्रान्सफॉर्मर उघड्या स्थितीत असल्यामुळे अपघात होऊन अजूनही निष्पाप लोकांचे बळी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर यामध्ये गंभीरतेने लक्ष घालून उघड्यावर धोकादायक अवस्थेत असलेल्या सर्व ट्रान्सफॉर्मरना तातडीने सेफ्टी बॉक्स बसवावेत, अशी मागणी करण्यात आली होती. दरम्यान ऊर्जामंत्र्यांनी या विषयासंदर्भात त्वरित बैठक घ्यावी आणि संपूर्ण समस्या मार्गी लावाव्या व अंतिम कारवाई करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा, असे आदेश मुख्य अभियंता, कल्याण महावितरण यांना दिले आहेत. (प्रतिनिधी)>तारांकित प्रश्नामुळे लक्ष वेधलेमुंबईत सुरु असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात याचे पडसाद उमटताना दिसून आले. विधान परिषद सदस्या विद्या चव्हाण, किरण पावसकर, जयदेव गायकवाड यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करून या विषयाकडे शासनाचे लक्ष वेधले असता वसई-विरार परिसरात धोकादायक अवस्थेत असलेल्या एकूण १३५ रोहित्रांना सुरक्षाकवच बसवल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. तर १०० रोहित्रांना सुरक्षाकाचा बसवण्याचे काम महावितरणकडून प्रगतीपथावर असल्याचे म्हटले आहे.
ट्रान्सफॉर्मरला सेफ्टी बॉक्स बसवा
By admin | Published: August 06, 2016 2:58 AM