पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यार्थ्यांची सेट परीक्षा २९ मे रोजी घेतली जाणार असून, विद्यार्थ्यांना १९ मेपासून संकेतस्थळावर प्रवेशपत्र (हॉल तिकीट) उपलब्ध करून दिले जाणार आहे. यंदा मॅथेमॅटिकल सायन्स (गणित) विषयाच्या प्रश्नपत्रिकेत बदल करण्यात आले असून, संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षेतील बदलाबाबत एसएमएसद्वारे कळविण्यात आले आहे. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी सेट परीक्षेसाठी पेपर १ प्रमाणे पेपर २ व ३च्या प्रश्नपत्रिकांचे चार ‘सेट’ तयार करण्यात आले आहेत.मॅथेमॅटिकल सायन्स विषयाच्या प्रश्नपत्रिकेत बदल करण्यात आले असून, पेपर क्रमांक २साठी ८४ बहुपर्यायी प्रश्न आहेत. त्यातील पहिले १६ सोडविणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांना ६८ प्रश्नांपैकी कोणतेही ३४ प्रश्न सोडवावे लागणार आहेत. सोडविलेल्या प्रश्नांपैकी पहिले ३४ प्रश्नच तपासले जाणार आहेत. त्याचप्रमाणे पेपर क्रमांक ३साठी १४५ वैकल्पिक प्रश्न असतील. त्यातील पहिले पाच प्रश्न सोडविणे बंधनकारक आहे. प्रश्नपत्रिकेतील १४५ प्रश्नांपैकी कोणतेही ७० प्रश्न सोडवावे लागतील. विद्यार्थ्यांनी सोडविलेल्या १४५ प्रश्नांपैकी प्रथमत: सोडविलेले ७० प्रश्न तपासले जातील, याची विद्यार्थ्यांनी नोंद घावी, असे सेट विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
सेट परीक्षेचे प्रवेशपत्र १९ मेपासून
By admin | Published: May 08, 2016 2:25 AM