नागपूर: गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षातील अंतर्गत धुसपूस चव्हाट्यावर येताना दिसत आहे. अलीकडेच भाजपमधील अनेक नगरसेवक, नेते, कार्यकर्ते यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याचे पाहायला मिळाले. भाजपमधील गळती सुरूच असून, विदर्भातील एका नेत्याने पक्षावर गंभीर आरोप करत भाजपला रामराम केला आहे. हा नेता आता काँग्रेसचा हात धरणार आहे.
पक्षावर नाराज असलेले विदर्भातील नेते छोटू भोयर (रवींद्र भोयर) यांनी भाजपला रामराम केला आहे. गेल्या काही दिवसांपासून छोटू भोयर पक्षावर नाराज होते. छोटू भोयर यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा असून, ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक राहिलो आहे. संघाने कधीच अन्याय-अत्याचार सहन करा, असे शिकवलेले नाही. काँग्रेसमध्ये प्रवेश करत असलो, तरी संघाची शिकवण, संघाचे विचार मनातून नाहीसे होणार नाहीत. काँग्रेसमधून विधान परिषदेची उमेदवारी नक्कीच माझ्यासाठी एक मोठी संधी आहे. उमेदवारीसाठी नाही, तर पक्षात ज्या पद्धतीचा व्यवहार झाला, त्यामुळे राजीनामा दिला, असे भोयर यांनी सांगितले.
भाजपमध्ये माझा छळ करण्यात आला
गेली ३४ वर्षे भाजपसोबत काम केले. तो पक्ष सोडताना मनात वेदना होत आहेत. मात्र ज्या भाजपला वाढवण्यासाठी दिवस-रात्र काम केले. अनेक नवीन लोकांना पक्षात आणले, त्याच भाजपमध्ये माझा छळ करण्यात आला. मला दाबण्यात आले आणि त्यामुळेच पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे, असे भोयर यांनी स्पष्ट केले.
विधान परिषदेची उमेदवारी मागितली होती
भाजपकडे विधान परिषदेची उमेदवारी मागितली होती. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मला प्रत्येक वेळेला मी या निवडणुकीत उभा राहणार नाही, असे सांगितले होते. मात्र नेमके उलट झाले. मला उमेदवारी नाकारण्यात आली. बावनकुळे यांना कामठी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारताना काय कारणे होती आणि ती सर्व कारणे नाहीशी झाली आहेत का, याचे स्पष्टीकरण भाजप नेतृत्वाने दिले पाहिजे. या मतदारसंघात भाजपकडे मोठी आघाडी आहे, असे म्हणतात. मात्र, भाजपकडे जेवढी आघाडी आहे तेवढ्याच मतांनी भाजप पराभूत झालेला पाहायला मिळेल, असा दावा भोयर यांनी केला.