मावळमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दे धक्का; १२५ पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2024 10:24 AM2024-03-01T10:24:26+5:302024-03-01T10:24:52+5:30

हे पाऊल उचलत असताना आम्ही लोणावळा शहरांमधील इतरही जुन्या जनता नेत्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे असं नाराज पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Setback to Ajit Pawar's NCP in Maval; Resignation of 125 office bearers | मावळमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दे धक्का; १२५ पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

मावळमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दे धक्का; १२५ पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

मावळ - लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना मावळमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. लोणावळा शहरातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सामुहिक राजीनामा दिल्यानं इथं पक्षाला खिंडार पडलं आहे. पक्षात मानसन्मान मिळत नाही, कुणी विचारपूस करत नाही. सातत्याने डावलले जाते असा आरोप या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. 

लोणावळा इथं पत्रकार परिषद घेत या पदाधिकाऱ्यांनी खदखद व्यक्त केली. एकाचवेळी १०० हून अधिक राजीनामे आल्यानं राष्ट्रवादीत फूट पडल्याचं दिसून आले.शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विनोद होगले हे संघटना वाढीसाठी चांगले काम करत होते. परंतु अचानक तडकाफडकी त्यांच्या जागेवर नवीन अध्यक्ष नेमण्यात आला. होगले यांना याची कुठलीही पूर्वकल्पना दिली नाही. त्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली. वारंवार पक्षातील वाद वरिष्ठांच्या कानावर टाकूनही त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे नाईलाजास्तव आम्हाला हे पाऊल उचलावं लागतंय असं पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ नेते बाळासाहेब पायगुडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस लोणावळा शहराचे माजी अध्यक्ष विनोद होगले. मावळ तालुका चित्रपट आणि सांस्कृतिक सेलचे संतोष कचरे त्याचसोबत दत्तात्रय गोसावी, अमोल गायकवाड, रमेश दळवी, सलीम मण्यार, अजिंक्य कुंटे, सुधीर कदम, कृष्णा साबळे, तुषार पाडाळे, रवी भोईने, अँड गायत्री रिले यांच्यासह बहुतांश पदाधिकारी उपस्थित होते. 

दरम्यान, हे पाऊल उचलत असताना आम्ही लोणावळा शहरांमधील इतरही जुन्या जनता नेत्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. ते देखील आमच्या सोबत असून पुढील काळामध्ये अनेक गोष्टींचा उलगडा होईल, लवकरच सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घोषित करू असा सूचना वजा इशारा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
 

Web Title: Setback to Ajit Pawar's NCP in Maval; Resignation of 125 office bearers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.