Uddhav Thackeray, Election Commission: ठाकरे गट विरूद्ध शिंदे गट हा संघर्ष आता निवडणूक चिन्हापर्यंत येऊन पोहोचला आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबत निर्णय घेण्याबाबतचा मुद्दा निवडणूक आयोगाकडे आहे. त्यातच आता निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला चिन्हाबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी चार आठवड्यांचा पूर्ण वेळ देण्यास नकार दिला आहे. कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी ठाकरेला गटाला आता केवळ १५ दिवसांचीच मुदत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. धनुष्यबाण या चिन्हावर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटामध्ये वाद सुरू आहे. या वादावर आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह ठाकरे गटाकडे राहण्यासाठी त्यांना काही महत्त्वाच्या कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असणार आहे. या साठी उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगोकडून चार आठवड्यांची मुदत मागितली होती. निवडणूक आयोगाकडून मात्र यासाठी उद्धव ठाकरे गटाला चार आठवड्यांचा पूर्ण वेळ द्यायला नकार देण्यात आला असून आता २३ ऑगस्टपर्यंत त्यांना आपलं म्हणणं निवडणूक आयोगापुढे मांडायचे आहे. राज्यातील सत्तासंघर्षावर २२ ऑगस्टला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यानंतर लगेच पुढच्याच दिवशी २३ ऑगस्टपर्यंत निवडणूक आयोगासमोर ठाकरे गटाला जावं लागणार आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे टेन्शन चांगलंच वाढणार असल्याचे दिसत आहे.
लोकसभा, विधानसभेत आपला वरचष्मा असल्याचा दावा एकनाथ शिंदे गटाने केला आहे. त्या पाठोपाठ आता पक्षसंघटनेतही बहुमत आमच्याकडे असल्याचे म्हणणे शिंदे गटाचे आहे. त्यासाठीची आकडेवारी देखील निवडणूक आयोगासमोर मांडण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांनी १९ जुलैला निवडणूक आयोगाला पत्र लिहले होते. त्यात अशी मागणी करण्यात आली होती की त्यांच्या नेतृत्वाखालील गटाला शिवसेना म्हणून मान्यता देण्यात यावी, तसेच धनुष्यबाण निवडणूक चिन्हदेखील मिळावे. याबाबत आता उद्धव ठाकरे गटाला आपली बाजू मांडायची आहे.