मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतील अनेक गावांच्या सरपंचांशी ‘आॅडियो ब्रीज’च्या माध्यमातून संवाद साधला आणि दुष्काळी परिस्थिती, उपाययोजनांचा आढावा घेतला. दुष्काळासंबंधी तक्रारींचा निपटारा ४८ तासांत करावा, असे आदेश त्यांनी या वेळी दिले.राज्याचे मुख्य सचिव युपीएस मदान, विविध विभागांचे सचिव, जिल्हाधिकारी, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच सहभागी झाले.चारा छावण्या, टँकर इत्यादींच्या मागणीबाबत तहसीलदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी समन्वय राखला पाहिजे. तहसीलदारांनी गावातील टँकरची संख्या निश्चित करताना २०१८ची लोकसंख्या विचारात घ्यावी. मंजूर टँकरपेक्षा कमी टँकर मिळत असतील, तर त्याचा अहवाल तहसीलदारांनी माझ्याकडे सादर करावा. बंद पडलेली नळ पाणीपुरवठा योजना तत्काळ सुरू करून त्यातून गावाला पाणी मिळू शकते. त्यामुळे त्याच्या दुरुस्तीचे काम लगेच हाती घेण्याचेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.दुष्काळग्रस्त गावातील सरपंचांनी जास्तीत जास्त जलसंधारणाची कामे करण्यावर भर द्यावा. अधिग्रहित विहिरींसाठी पूर्वी निश्चित रक्कम दिली जात होती. आता त्या विहिरीतून टँकरमध्ये किती पाणी भरले, त्यावर निधी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सरपंचांकडून प्रत्यक्ष गावातील स्थितीची माहिती घेत, इतरही निर्देश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच तहसीलदारांना तक्रारींसाठी एक सामायिक क्रमांक उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्या सर्व तक्रारींची ४८ तासाच्या आत दाखल घेण्यात येईल आणि निराकरण सोपे होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दुष्काळासंबंधी तक्रारींचा ४८ तासांत निपटारा करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 5:40 AM