कोल्हापूर : अंबाबाई मंदिर गाभाऱ्यातील प्रवेश प्रकरणावरून भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना मारहाण केल्याप्रकरणी श्रीपूजकांसह सात जणांवर शनिवारी पहाटे जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. देसाई यांना मारहाण झाल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये स्पष्ट दिसत आहे. या गुन्ह्याचा अहवाल न्यायालयास सादर केला असून संशयित आरोपींना समन्स बजावून चौकशीसाठी बोलाविणार असल्याचे पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी सांगितले. अॅड. केदार वसंत मुनिश्वर (वय ४८), श्रीश रामभाऊ मुनिश्वर (६०), चैतन्य शेखर अष्टेकर (३५), मयूर मुकुंद मुनिश्वर (४२), निखिल शानभाग (२८, सर्व रा. वांगी बोळ, महाद्वार रोड), राष्ट्रवादीचे कार्यकर्ते किसन मुरलीधर कल्याणकर (५२), जयकुमार रंगराव शिंदे (५०, दोघे रा. मंगळवार पेठ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. देवीच्या श्रीपूजकांवर अशा प्रकारच्या घटनेबद्दल झालेली ही पहिलीच कारवाई आहे. तृप्ती देसाई काही महिलांसह बुधवारी (दि. १३) अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आल्या असताना त्यांना गाभाऱ्यातून बाहेर ओढत श्रीपूजकांसह काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांसमोर त्यांना मारहाण केली. मारहाण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, अन्यथा कोल्हापुरात येऊन पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा देसाई यांनी जिल्हा प्रशासनास दिला होता. कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीही पोलीस प्रशासनास चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी शुक्रवारी पोलीस प्रशासनाची तातडीने बैठक बोलावून अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करत या प्रकरणाचा तपास अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे डॉ. बारी यांनी मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज बारकाईने पाहिले. त्यामधील चित्रीकरण पाहण्यात आले. धक्काबुक्की व मारहाण करणारे केदार मुनिश्वर, श्रीश मुनिश्वर, चैतन्य अष्टेकर, मयूर मुनिश्वर, निखिल शानभाग व त्यांचे समर्थक, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते किसन कल्याणकर, जयकुमार शिंदे आदींची नावे निष्पन्न झाली. त्यानंतर पहाटे गुन्हा दाखल झाला. (प्रतिनिधी)या कलमाखाली गुन्हा कलम १४३/१४७ - गैरकायदेशीर जमाव जमविणे, ३५३ - शासकीय कामात अडथळा, ३३६/३३७ - जीवितास धोका निर्माण होईल असे कृत्य, ३३२ - शासकीय कर्मचारी जखमी करणे, ५०६ - जिवे मारण्याची धमकी देणे आणखी नावे निष्पन्न होणारतृप्ती देसाई यांच्या अंगावर हळद-कुंकू फेकताना व मारहाण करताना आणखी काही महिलांचा समावेश आहे. त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहेत. त्यांची नावे निष्पन्न करून त्यांनाही आरोपी करण्यात येणार असल्याचे निरीक्षक देशमुख यांनी सांगितले.
श्रीपूजकांसह सात जणांवर गुन्हा दाखल
By admin | Published: April 17, 2016 2:41 AM