ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 22 – ‘जल है तो कल है’ हा जलबचतीचा संदेश देण्यासाठी जैन इरिगेशन सिस्टिम्स्, नीर फाउंडेशन व शासनाचा जलसंपदा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय महामार्गावरील खेडी शिवारातील दूरदर्शन टॉवरजवळ सात एकर क्षेत्रात मनोवेधक महाकाय रांगोळी 10 एप्रील 2016 ला साकारली. सुमारे 750 स्वयंसेवकांनी एकूण 28, 224 चौरस मीटरमध्ये 8 विविध रंगांत, 63 टन इकोफ्रेंडली रांगोळीचा वापर करून ही भलीमोठी रांगोळी साकारली होती. या उपक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झालेली आहे. विक्रमाबाबतचे प्रमाणपत्र नीर फाउंडेशन आणि जैन इरिगेशनला नुकतेच प्राप्त झाले.
ही रांगोळी साकारण्यासाठी साधारणत: दोन तासांच्या कालावधीचा अंदाज होता. मात्र, शहरातील विविध महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह सेवाभावी संस्थांच्या मदतीने अवघ्या 40 मिनिटांत रांगोळी साकारली. या उपक्रमात गोदावरी महाविद्यालय, आयएनएफडी महाविद्यालय, मू. जे. महाविद्यालय, वर्षा पाटील फॅशन डिझायनिंग महाविद्यालय, बांभोरी अभियांत्रिकी, रायसोनी महाविद्यालय, गुलाबराव देवकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह विविध संस्था, संघटनांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला.
“जैन इरिगेशनचे संस्थापक मा. मोठेभाऊंनी पाणी, शेती आणि शेतकरी हे जिव्हाळ्याच्या विषयांवर आयुष्यभर कार्य केले. याच जाणीवेतून, बांधिलकीतून जैन इरिगेशनने उच्च कृषि तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला. पीव्हीसी पाईप, ठिबक सिंचनाच्या माध्यमातून जलबचतीचा मंत्र दिला. हाच वसा आणि वारसा घेऊन जैन इरिगेशन जनसान्यांना पाण्याचे महत्त्व पटवून देत आहे. राज्याला भेडसावणाऱ्या दुष्काळी परिस्थितीची जाणीव करून देत, पाण्याचा काटकसरीने वापर व्हावा हा जलबचतीचा मोलाचा संदेश नागरिकांपर्यंत रांगोळीच्या माध्यमातूनच पोहोचला. हाच धागा घेऊन जैन इरिगेशनने नीर फाउंडेशनच्या गत वर्षी झालेल्या या उपक्रमाला सहकार्य केले. आज लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने प्रमाणपत्र देऊन शिक्कामोर्तब केले याचा मनस्वी आनंद आहे.”
-अशोक जैन, अध्यक्ष जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि. जळगाव.
“पाणी हा एकमेव महत्त्वाचा विषय घेऊन नीर फाउंडेशनची आम्ही स्थापना केली. वैश्विक पातळीवर जलबचतीचा संदेश देण्यासाठी सर्वात मोठी रांगोळी साकारण्याचे ठरविले आणि तसे करून दाखविले. आज लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने प्रमाणपत्र दिले. नजिकच्या काळात गिनीज बुक ऑफ द वर्ल्ड रिकॉर्डमध्येही आमच्या उपक्रमाची नोंद होईल. मिळालेल्या या प्रमाणपत्रामुळे आम्हाला प्रोत्साहन तर मिळालेच परंतु अजून उत्तुंग कार्य करण्याची प्रेरणाही मिळाली आहे. यापुढेही नीर फाउंडेशनच्यावतीने जलजागृति आणि जलसंवर्धनासाठी जोमाने कार्य करत राहू.”
-सागर महाजन, संस्थापक अध्यक्ष नीर फाउंडेशन, जळगाव.