चाकण : शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलनाचा पहिला लढा सुरू केला तो चाकणहून. आंदोलनाचे साक्षीदार व अटक झालेले तत्कालिन आमदार राम कांडगे म्हणाले ‘‘जोशीसाहेबांनी ७ मार्च १९८० रोजी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. कांदा पिकाला उत्पादनाच्या आधारे योग्य भाव मिळावा म्हणून त्यांनी ८ मार्च १९८० रोजी चाकणच्या मार्केट यार्ड मध्ये आमरण उपोषण सुरु केले. या वेळी बाजारात एक लाख कांदा पिशव्यांची आवक झाली होती. या उपोषणाला पुणे जिल्हा व परिसरातील हजारो शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला. चाकण परिसरातील बारा वाड्या व सर्व गावांतील शेतकऱ्यांनी प्रत्येक घरातील बैलगाडी आणून पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मोशीपासून मंचर पर्यंत ४५ किलोमीटर रस्त्यावर चार ते पाच हजार बैलगाड्या मोकळ्या सोडून दिल्या. संपूर्ण जिल्ह्यात शेतकऱ्यांनी अनुकरण करून शिक्रापूर रस्ता, नगर रस्ता, तळेगाव रस्ता, पाबळ रस्ता व मावळातील रस्ते अडविले. यामुळे पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक ठप्प होऊन हा रस्ता सात दिवस बंद झाला.या उपोषणाला सर्व पक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला. या आंदोलनात माजी आमदार रामभाऊ कांडगे, पंचायत समितीचे माजी सभापती स्व. वामनराव ठाकूर, बाजार समितीचे सभापती मारुतराव बारणे, आमदार सुरेश गोरे यांचे चुलते गुलाब गोरे, बाजार समितीचे माजी संचालक काळूराम भिकाजी कड यांच्यासह खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर, हवेली व मावळ तालुक्यातील ५४० शेतकऱ्यांना अटक करून येरवडा जेलमध्ये ठेवण्यात आले होते. या आंदोलनाला यश येऊन शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. कांद्याला ४५ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. सर्व शेतकऱ्यांना १४ मार्चला येरवड्यामधून सोडले. १५ मार्च १९८० रोजी जोशी यांनी जॉर्ज फर्नांडिस यांच्या हस्ते उपोषण सोडले.
पुणे-नाशिक महामार्ग होता सात दिवस बंद
By admin | Published: December 14, 2015 12:27 AM