कऱ्हाड : बोगस कर्ज प्रकरणाच्या आरोपावरून कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते व उपाध्यक्ष सुरेश पाटील अटकेत असतानाच शनिवारी या प्रकरणात सात माजी संचालकांनाही पोलिसांनी अटक केली. सकाळी एकाचवेळी सर्व माजी संचालकांच्या घरांवर पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी सातजण पोलिसांच्या हाती लागले. अटक केलेल्यांपैकी चौघांना न्यायालयीन, तर तिघांना पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. अशोक मारुती जगताप (वय ५५, रा. वडगाव हवेली), सर्जेराव रघुनाथ लोकरे (५२, रा. येरवळे, ता. कऱ्हाड), संभाजी रामचंद्र जगताप (७३, कोडोली, ता. कऱ्हाड), बाळासाहेब दामोदर निकम (६९, रा. शेरे, ता. कऱ्हाड), उदयसिंह प्रतापराव शिंदे (५०, रा. बोरगाव), वसंत सीताराम पाटील (६८, रा. नेर्ले, ता. वाळवा), महेंद्र ज्ञानू मोहिते (५६, रा. वाटेगाव, ता. वाळवा) अशी पोलिसांनी अटक केलेल्या माजी संचालकांची नावे आहेत. रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यात बोगस कर्ज प्रकरणे झाल्याचा प्रकार आठ महिन्यांपूर्वी उघडकीस आला आहे. याबाबत ऊसतोडणी वाहतूकदार यशवंत रामचंद्र पाटील (रा. तांबवे, ता. वाळवा) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. कृष्णा कारखान्याच्या २०१४-१५ च्या गळीत हंगामासाठी ऊसतोडणी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना प्रत्येकी ७ लाखांप्रमाणे परतफेड करण्याची नोटीस बँक आॅफ इंडियाकडून पाठविण्यात आली होती. तांबवे येथील वाहतूकदार यशवंत पाटील यांनाही नोटीस २६ नोव्हेंबर २०१५ रोजी मिळाली. नोटीस मिळाल्यानंतर यशवंत पाटील यांच्यासह अन्य ऊस वाहतूकदारांनी बँकेत जाऊन चौकशी केली. त्यावेळी त्यांच्या नावे कर्ज प्रकरण असल्याचे समोर आले. संबंधित शेतकऱ्यांनी २०१३-१४ मध्ये तोडणी वाहतूक करारासाठी ट्रॅक्टर-ट्रॉलीची तसेच त्यांची वैयक्तिक कागदपत्रे कारखान्याकडे दिली होती. मात्र, त्या हंगामात संबंधित वाहतूकदारांना करारानुसार ठरलेली उचल न मिळाल्याने वाहनधारकांनी तोडणी वाहतुकीसाठी आपले वाहन लावले नाही. तरीही या वाहतूकदारांच्या नावे प्रत्येकी सात लाखांचे कर्ज उचलल्याचे बँकेच्या नोटिसीनंतर समोर आले. या प्रकरणात १४ फेब्रुवारी रोजी अविनाश मोहिते व उपाध्यक्ष सुरेश पाटील यांना अटक झाली. सध्या ते दोघे न्यायालयीन कोठडीत आहेत.दरम्यान, शनिवारी सकाळी कऱ्हाड शहर पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकांनी एकाचवेळी ‘कृष्णा’च्या तत्कालीन संचालक मंडळाच्या घरांवर छापे टाकले. साताऱ्यासह सांगली जिल्ह्यात हे छापासत्र करण्यात आले. त्यामध्ये सात संचालक पोलिसांना घरामध्ये आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पोलिस ठाण्यात आणून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी चारच्या सुमारास त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव तपास करीत आहेत. संचालकांचा ठरावकर्ज प्रकरणाबाबत तत्कालीन संचालक मंडळाच्या वेळोवेळी बैठका झाल्या होत्या. त्या बैठकांमध्ये कर्जाबाबतची कार्यवाही झाली आहे. तसेच एका बैठकीत सर्व संचालक मंडळाने ठराव करून अध्यक्ष, उपाध्यक्षांना कर्जाबाबत निर्णय घेण्याचा व सही करण्याचा अधिकार बहाल केला असल्यामुळे तेही या प्रकरणात सहभागी असल्याचे समोर आले, असे निरीक्षक जाधव म्हणाले. बँक अधिकाऱ्यांनाही होणार अटककृष्णाच्या तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळासह बँक अधिकाऱ्यांचाही या प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप फिर्यादीतच करण्यात आला आहे. तसेच पोलिस तपासातूनही काही मुद्दे समोर आले आहेत. त्यामुळे तपासात या प्रकरणामध्ये सहभागी असणाऱ्या बँक अधिकाऱ्यांनाही अटक केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रकृतीच्या कारणास्तव न्यायालयीन कोठडीसात संचालकांना न्यायालयात हजर करण्यात आले. अशोक जगताप, सर्जेराव लोकरे, संभाजी जगताप व बाळासाहेब निकम या चौघांना प्रकृतीच्या कारणास्तव पोलिस प्रक्रिया राखून ठेवून न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. तर उदयसिंह शिंदे, वसंत पाटील व महेंद्र मोहिते या तिघांना दि. १८ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
‘कृष्णा’च्या सात माजी संचालकांना अटक
By admin | Published: April 16, 2017 1:15 AM