मुंबई : राज्यात निवडून आलेले सात अपक्ष आमदार भाजपाची सत्ता आली तर सत्तापक्षासोबत जातील, असे मानले जात आहे. अद्याप कोणीही भूमिका मात्र जाहीर केलेली नाही. हे सगळे आमदार आमच्यासोबत येतील, असा दावा भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘लोकमत’शी बोलताना केला. भोसरीतून जिंकलेले महेश भोसरे मूळ राष्ट्रवादीचे पण आता ते भाजपासोबत जातील, असे म्हटले जाते. परभणी जिल्ह्यातील पाथरीचे आ. मोहन फड हे देखील भाजपासोबत जातील, अशी शक्यता आहे. त्यांचा निर्णय झालेला नाही. अमरावतीतील बच्चू कडू गेल्यावेळीही अपक्षच जिंकले होते आणि त्यांनी काँग्रेसला साथ दिली होती. सत्तापक्षाला साथ देण्याचा त्यांच्याबाबतचा अनुभव पाहता यावेळीही ते तसाच निर्णय घेऊ शकतात. बडनेराचे आमदार रवि राणा यांची पत्नी राष्ट्रवादीतर्फे लोकसभेची निवडणूक लढली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ते फार मानतात. राणा हे बाबा रामदेव यांचे नजीकचे मानले जातात. राणा आपल्या राजकीय गुरुंचे ऐकतात की अध्यात्मिक गुरुंचे यावर त्यांचा निर्णय अवलंबून असेल. राजकीय गुरूने आधीच भाजपाला बाहेरून पाठिंबा दिला आहे. कल्याण पूर्वचे अपक्ष आमदार गणपत गायकवाड हेही सत्तापक्षाची कास धरतील, असे मानले जाते. अमळनेरमधून जिंकलेले अपक्ष आमदार शिरीश चौधरी भाजपासोबत जातील हे जवळपास स्पष्ट आहे. ते माजी मंत्री आणि आता भाजपाकडून नंदुरबारमध्ये निवडून आलेले डॉ.विजयकुमार गावित यांचे अत्यंत जवळचे आहेत. (विशेष प्रतिनिधी)
सात अपक्ष आमदार सत्तेसोबत जाणार!
By admin | Published: October 20, 2014 6:24 AM