भुसूरूंग स्फोट : मोहिमेवरून परतणारे दोन जवान घायाळगडचिरोली : नक्षलवाद्यांच्या आंतरराष्ट्रीय विभागाचा अध्यक्ष आणि दिल्ली विद्यापीठातील इंग्रजीचा प्राध्यापक जी. एल. साईबाबा याला अटक झाल्यापासून ७२ तासांच्या आत गडचिरोली पोलीस मुख्यालयापासून अवघ्या ३० कि.मी. अंतरावर विशेष मोहिमेवरून परतणार्या पोलीस ताफ्यातील एक वाहन नक्षलवाद्यांनी भूसुरूंग स्फोटात उडविल्याने ७ पोलीस जवान जागीच शहीद झाले. तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. दोन दिवस चामोर्शी तालुक्यातील येडानूर जंगल परिसरात नक्षलविरोधी शोध मोहीम राबवून रविवारी सकाळी परतीच्या प्रवासाला निघालेल्या ८ सुमो गाड्यांच्या पोलीस ताफ्यातील एक वाहन उडवून देण्यासाठी सकाळी १० वाजता मुरमुरी ते जोगना या गावादरम्यान पोर नदीच्या पुलावर नक्षलींनी हा भीषण स्फोट घडवून आणला. चामोर्शी तालुक्याच्या पावीमुरांडा, येडानूर जंगल परिसरात नक्षलवाद्यांच्या शोध मोहिमेसाठी दोन दिवसांपासून पोलिसांचे विशेष ऑपरेशन सुरू होते. या ऑपरेशनसाठी गडचिरोली पोलीस दलातील सी-६० पथकाच्या पार्ट्या गडचिरोली पोलीस मुख्यालयातून रवाना करण्यात आल्या होत्या. या पार्ट्यांना मुरमुरीपर्यंत वाहनाने सोडून देण्यात आले होते. या मोहिमेवर असलेल्या सर्व जवानांच्या परतीच्या प्रवासासाठी वाहनांचा हा ताफा पाठविण्यात आला होता. ऑपरेशनसाठी ज्या ठिकाणी सोडण्यात आले होते. तेथेच जवानांना परत नेताना वाहनांचा ताफा येणार आहे, याची कुणकुण नक्षलवाद्यांना लागली. त्यानुसार या मार्गावर नक्षल्यांनी स्फोटके पेरून ठेवली होती. पोर नदीलगत असलेल्या पाण्याच्या टाकीजवळून पुलापर्यंत भूमिगत वायरींग पसरविली होती. पोलिसांच्या या ताफ्यातील पहिली दोन वाहने सुरळीत जाऊ देणार्या नक्षलींनी त्यानंतरच्या वाहनासाठी भुसूरूंग स्फोट घडवून आणला. स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती, की त्याने घटनास्थळी पाच फुटाचा खोल खड्डा पडला. तसेच ही गाडी १० ते १५ फूट उंच फेकली गेली. यात या गाडीची भयावह दुर्दशा झाली. तिचे अवशेष गोळा करून ते ट्रकद्वारे आणावे लागले. नक्षलवादविरोधी मोहिमेचे अवघड कर्तव्य बजावताना या स्फोटात पोलीस शिपाई सुनिल तुकडू मडावी रा. दुर्गापूर (जि. चंद्रपूर), रोहन हनुमंत डंबारे रा. चामोर्शी (जि. गडचिरोली), सुभाष राजेश कुमरे रा. जारावंडी ता. एटापल्ली, दुर्योधन मारोती नाकतोडे रा. कुरूड ता. देसाईगंज, तिरूपत्ती गंगय्या अल्लम रा. चिूर (अंकिसा) ता. सिरोंचा, पोलीस नायक दीपक रतन विघावे रा. श्रीरामपूर (जि. अहमदनगर), वाहन चालक लक्ष्मण पुंडलिक मुंडे रा. अंतरवेली ता. गंगाखेड (जि. परभणी) हे घटनास्थळीच शहीद झाले. तर या घटनेत पंकज शंकर सिडाम रा. जारावंडी ता. एटापल्ली, हेमंत मोहन बन्सोड रा. पोटगाव (विहिरगाव) ता. देसाईगंज जि. गडचिरोली हे जखमी झाले आहेत. दोघांचीही प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना उपचारासाठी नागपूर येथे हेलिकॉप्टरने हलविण्यात आले आहे. शहीद झालेल्या सात पोलीस जवानांचे पार्थिव दुपारी १२.४५ वाजता जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोली येथे आणण्यात आले होते. विशेष अभियानासाठी गेलेल्या पोलीस पथकातील इतर पोलीस जवानांचा रूग्णालय परिसरात आक्रोश होता. आपले सहकारी गमाविल्याचे दु:ख त्यांच्या चेहर्यावर स्पष्टपणे दिसत होते. भुसुरूंग स्फोटाच्या घटनेपूर्वी ६ मे ला याच भागात खासगी बांधकाम कंत्राटदाराचा एक टँकर नक्षलवाद्यांनी जाळला होता. हे ठिकाण गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून केवळ ३० किमी अंतरावर आहे. स्फोटानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळावर मोठी गर्दी केली होती. परिणामी संपूर्ण घटनास्थळावर नाकेबंदी करून पोलिसांना पंचनामा करावा लागला. भुसुरूंग स्फोटामुळे रस्त्यावर पडलेला खड्डा तत्काळ बुजविण्यात आला. (प्रतिनिधी)-------------जखमी झालेल्या दोन्ही जवानांना हेलिकॉप्टरमधून नागपुरातील ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले असून, हेमंत बन्सोड यांची प्रकृती चिंताजनक तर पंकड सेडाम धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे. -------------
मानवताविरोधी कृत्य !
हल्ला मानवताविरोधी कृत्य असून त्याने नक्षलवादविरोधी मोहिमेवर काहीच परिणाम होणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हल्ल्याचा निषेध केला आहे.