मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सात जणांची महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवड निश्चित झाली आहे. आठवा अर्ज त्रुटींमुळे मंगळवारी फेटाळण्यात आला.शरद पवार, फौजिया खान (राष्ट्रवादी), केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, माजी खासदार उदयनराजे भोसले आणि औरंगाबादचे डॉ.भागवत कराड (भाजप), राजीव सातव (काँग्रेस) आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्या बिनविरोध निवडीच्या घोषणेची औपचारिकता आता बाकी आहे.महाराष्ट्र विधानसभेतून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या सात जागांसाठीची ही निवडणूक होती. किशोर चव्हाण यांनी या निवडणुकीसाठी आठवे उमेदवार म्हणून अर्ज भरला होता. छाननीमध्ये सोमवारी तो रद्द ठरविण्यात आला. ही निवडणूक २६ मार्चला होणार होती पण आता सात जागांसाठी सातच अर्ज आल्याने ती बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला.आता एप्रिलमध्ये होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीबाबत उत्सुकता असेल. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान परिषदेवरनिवडून जातील, हे जवळपास निश्चित आहे.
शरद पवारांसह सात जण राज्यसभेवर बिनविरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 5:07 AM