अभिनेता भरत जाधवशी सखींच्या मनमोकळ्या गप्पा : लोकमत सखी मंचचा उपक्रम नागपूर : महिलांना तयारी करण्यास नेहमी वेळ लागतो, अशी तक्रार असते. महिला नटून तयार होण्यासाठी फार वेळ लावतात, असा आरोपही त्यांच्यावर होतो. थेट अभिनेता भरत जाधव समोर पाहून आणि ‘मोरूच्या मावशी’ नाटकात तो स्त्रीवेशात असल्याने सखींनीही त्याला थेट प्रश्न केला. तुम्हाला साडी घालून तयार व्हायला किती वेळ लागतो. त्यावर भरत जाधवने फक्त सात मिनिटात मी साडी घालून रंगमंचावर येतो, असे सांगितले आणि साऱ्या सखी अवाक् झाल्या. हे कसे शक्य होते, साडी कशी घालता, निऱ्या योग्य बांधता की नाही, अशा प्रश्नांच्या सरबत्तीला हास्याचे षटकार ठोकत भरतनेही लोकमत सखी मंचच्या विभाग प्रतिनिधींशी मनमोकळा संवाद साधला आणि गप्पांची ही मैफिल रंगली. नाट्यक्षेत्रात कसे आलात आणि नट जन्मत:च तयार असावा लागतो का? असा प्रश्न केला असता त्यानेही छान मिश्किल उत्तर दिले. आपण सगळेच नट असतो आणि प्रत्येकालाच अभिनय करता येतो. महिलाही त्यांच्या नकळत अभिनय करतातच. नवऱ्यासमोर कसे वागायचे आणि सासूसमोर कसे वागायचे, हे त्यांना बरोब्बर कळतेच ना! (हंशा) त्यामुळे आवड असली तर रंगमंचावरही अभिनय करता येतो. मला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्यात मला चांगले मित्र लाभले. केदार शिंदे, अंकुश चौधरी आणि मी एकत्रित एकांकिका स्पर्धेत सहभागी व्हायचो. त्यात आम्ही ‘आॅल द बेस्ट’ ही एकांकिका बसविली आणि त्यानंतर त्याचे नाटकही तयार झाले. हे नाटक तुफान चालले. हळूहळू मी या क्षेत्रात स्थिरावलो. मी मुळात अभिनेता, नट आहे. विनोदी नट आहे, असे नाही. विनोदी भूमिका मिळाली म्हणून विनोदी भूमिका केली. व्यक्तिगत आयुष्यात मी विनोद सांगत बसत नाही. नाटकात विनोदी काम करतो. रंगमंच, चित्रपट आणि मी वेगळा आहे. वेगळे असायलाही हवे. मुळात मी संकोची माणूस आहे. पण नट म्हणून काम करताना भूमिकेशी न्याय करण्याचा माझा प्रयत्न असतो. आपली आवड आणि व्यवसाय एकच झाला तर आयुष्यात समाधान मिळते. ते समाधान मी मिळवितो आहे. त्यामुळे आवड असेल तर अभिनयाच्या क्षेत्रात या, पण धरून-बांधून येऊ नका. जे आवडते ते करण्याचा प्रयत्न करा. मोरूची मावशी नाटकात काम करण्याची संधी मिळाल्यावर यापूर्वी ज्यांनी मावशीची भूमिका केली त्या विजय चव्हाण यांनी मला खूप टिप्स दिल्या. साडी कशी नेसायची, निऱ्या कशा बांधायच्या आणि साडी मध्येच सुटू नये म्हणून काय काळजी घ्यायची. त्यांच्यापासून मला बरेच शिकता आले. माझ्या पहिल्या प्रयोगाला ते स्वत: उपस्थित होते. जुन्या पिढीने हे नाटक पाहिले आहे. पण एवढे दर्जेदार नाटक नव्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे, या भावनेने या नाटकात मी भूमिका करतो आहे. त्यात पुरुष असलो तरी बाई वाटली पाहिजे आणि ती बीभत्स न वाटता सोज्वळ वाटली पाहिजे म्हणून विशेष प्रयत्न करावे लागतात. आता हे गणित जमले म्हणूनच तर १५२ दिवसात १०३ प्रयोगांचा टप्पा गाठता आला. मला दोन मुले आहेत, पण त्यांनी नाटकात काम करावे, असा माझा हट्ट नाही. कारण त्यांना काय आवडते, ते त्यांनी ठरवायचे आहे. माझी आवड मी त्यांच्यावर थोपवू शकत नाही. याप्रसंगी लोकमत समाचारचे प्रॉडक्ट हेड मतीन खान प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन नेहा जोशी यांनी केले. (प्रतिनिधी)सखी मंचची प्रगती ‘सही रे सही’ लोकमत सखी मंचच्यावतीने या संवादाचे आयोजन लोकमत भवनातील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत करण्यात आले. भरत जाधवने कलाविथिकेत प्रवेश करताच खास पद्धतीने टाळ्या वाजवून सखींनी त्याचे स्वागत केले. काहींनी झक्कास शिट्टीही वाजवली. या अनोख्या स्वागताने भरत जाधवही सुखावला. आठ हजार नाटकांचे प्रयोग पूर्ण केलेला हा मराठीतील नट प्रत्यक्ष संवाद साधतच असल्याचे पाहून सखींचा उत्साह वाढला. याप्रसंगी भरत जाधव म्हणाला, लोकमत सखी मंचचे नाव मी ऐकले आहे. सखी मंचला १४ वर्षे पूर्ण होत आहेत आणि माझ्या ‘सही रे सही’ नाटकाला १३ वर्षे पूर्ण झाली आहेत. म्हणजे आपली दोघांचीही प्रगती सध्या सहि सुरू आहे. सखी मंचच्या माध्यमातून महिलांसाठी खूप उपक्रम राबविले जातात. त्याची माहिती सातत्याने मिळत असते. महिलांचे हे मोठे व्यासपीठ आहे. यातून महिलांचा आत्मविश्वास दुणावतो. लोकमतच्या माध्यमातून हे अत्यंत महत्त्वाचे कार्य सुरू असल्याबद्दल त्याने सर्व सखींना शुभेच्छा देत सतत समाजासाठी चांगले करीत राहण्याचे आवाहन केले.
सात मिनिटात मी साडी घालून येतो !
By admin | Published: July 06, 2014 12:57 AM