मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील कान्हेरी गुंफांच्या परिसरात सात नव्या गुंफांचा शोध लागला आहे. मुंबई विद्यापीठाचा बहि:शाल विभाग आणि विलेपार्ल्याच्या साठ्ये महाविद्यालयाच्या प्राचीन भारतीय संस्कृती व बौद्धविद्या विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा संशोधन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.तब्बल ५ ते ६ वर्षांच्या अभ्यासाअंती हा निष्कर्ष समोर आल्याची माहिती साठ्ये महाविद्यालयाच्या प्राचीन भारतीय संस्कृती आणि बौद्धविद्या विभागाचे प्रमुख सूरज पंडित यांनी दिली. गुंफांच्या संशोधनाकरिता त्या संदर्भातील विविध भाषांमधील साहित्य, संदर्भांची माहिती घेण्यात आली. त्यावेळी गेल्या अनेक वर्षांपासून ज्ञात असलेल्या कान्हेरी गुंफाव्यतिरिक्त तेथे गुंफा असाव्यात, असे निरीक्षण नोंदविल्याचे पंडित यांनी सांगितले.भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या परवानगीनंतर गेल्या वर्षी फेब्रुवारी २०१५ साली या गुंफांचा शोध पूर्ण झाला. या संशोधन प्रक्रियेत गुंफांच्या ठिकाणी पाण्याचं टाकं, स्तूपाचे दगड आणि काही मूर्तींचे अवशेष सापडले आहेत. संशोधन प्रकल्पात साठ्ये महाविद्यालयाचा आकाश पवार याचेही सहकार्य लाभल्याचे पंडित यांनी सांगितले, परंतु आता नव्या गुंफांच्या ठिकाणी उत्खनन करता यावे, यासाठी केंद्र सरकारच्या भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्यांच्या परवानगीनंतर मार्चच्यादरम्यान या ठिकाणी शास्त्रीय पद्धतीने उत्खनन करण्यात येईल.
कान्हेरी परिसरात सात नव्या गुंफा!
By admin | Published: January 18, 2016 3:09 AM