इचलकरंजी : अपघातामध्ये गंभीररीत्या जखमी झालेल्या आणि मृत्यूच्या दारात असलेल्या युवकाचे हृदय, यकृत महत्त्वाचे अवयव दान करून सातजणांना जीवनदान देण्याचे दातृत्व माता-पित्यांनी दाखविल्याची दुर्मीळ घटना बंगलोर येथे घडली. अपघातग्रस्त युवक हा येथील कामगार नेते शिवानंद पाटील यांचा भाचा असल्याने त्या युवकाच्या माता-पित्यांचे मन तयार करण्याचे मोठे काम पाटील यांनी केले.शिवानंद पाटील हे येथील एका कामगार संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांचा सदलापूर (जि. सोलापूर) येथील भाचा पंडित शिवराय बजे (वय २८) हा बंगलोर येथील एका खासगी कंपनीमध्ये काम करीत होता. तो कामावरून परतत असताना मागील बाजूने त्याला एका भरधाव बसने धडक दिली. त्यामध्ये तो गंभीररीत्या जखमी झाला. त्याला बंगलोर येथील व्हिक्टोरिया रुग्णालयाध्ये दाखल केले होते; पण पंडित याच्या डोक्याला मोठा आघात झाल्यामुळे त्याचा मेंदू निकामी झाला होता; मात्र शरीराचे अन्य सर्व अवयव चांगले होते.अपघाताची माहिती समजताच पंडित बजे याचे माता-पिता आणि कामगार नेते शिवानंद पाटील हे तातडीने बंगलोरला गेले. पाटील यांनी येथील प्रमुख डॉक्टरांशी चर्चा केली. त्यावेळी पंडित हा मृत्यूच्या दारात असून, त्याला निव्वळ कृत्रिम श्वासोच्छ्वासावर जिवंत ठेवण्यात आले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच पंडित याचे हृदय, यकृत, मूत्रपिंड असे अवयव दान केल्यास गंभीररीत्या आजारी असलेल्या अन्य रुग्णांना जीवनदान मिळेल, असा सल्ला रुग्णालयाच्यावतीने देण्यात आला. तेव्हा पाटील यांनी पंडित याचे माता-पिता सुशीला शिवराय बजे व शिवराय बळवंत बजे यांना वस्तुस्थिती समजावून सांगून अवयव दान करण्यासाठी प्रवृत्त करण्याचे कठीण काम पार पाडले. आई-वडिलांनीसुद्धा पंडित याच्या अवयवदानास तयारी दर्शविली. याचा परिणाम म्हणून पंडित याचे हृदय तातडीने विमानाने हैदराबाद येथे नेण्यात आले. तेथील यशोदा हॉस्पिटलमध्ये असलेल्या एका रुग्णास हे हृदय बसवून जीवनदान देण्यात आले, तर बंगलोर येथीलच सेंट जॉर्ज मेडिकल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमधील एका रुग्णावर मूत्रपिंडाचे रोपण करण्यात आले. अशा प्रकारे हैदराबाद येथील एका, तर बंगलोर येथील सहा रुग्णांना वेगवेगळे अवयव बसवून त्यांना जीवनदान देण्यात आले. त्यामुळे पंडित याचे माता-पिता सुशीला व शिवराय यांच्या आदर्श कार्याची प्रचिती या रुग्णांना आली आणि त्यानिमित्ताने त्यांच्या अपघातग्रस्त मुलाच्याही स्मृती चिरंतर राहिल्या, याची चर्चा येथे आहे. (प्रतिनिधी)
सातजणांना मिळाले अपघातग्रस्त युवकाच्या अवयवदानामुळे जीवनदान
By admin | Published: March 09, 2015 8:42 PM