लोकमत न्यूज नेटवर्क श्रीनगर / नागपूर : उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात गुलमर्ग येथे रविवारी केबल कार तुटून सात जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये नागपुरातील एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश आहे. हे वृत्त सायंकाळी नागपुरात आल्यानंतर जुना सुभेदार ले-आऊट परिसरात तीव्र शोककळा पसरली. गुलमर्ग आणि गोंडोला दरम्यान पर्यटकांची ने-आण करण्यासाठी तारेवर चालणारी केबल कार बसविलेली आहे. या कारमध्ये नागपुरातील जयंत अंड्रसकर (४२), त्यांची पत्नी मनिषा (४०) तसेच अनघा (५) आणि जान्हवी (७) या दोन मुलींसह त्यांचे गाईड बसले होते. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे एक मोठे झाड उन्मळून केबल कारच्या तारेवर पडले व त्या वजनाने तार तुटली. तार तुटल्याने तिच्यावरून पुढे सरकणारी केबल कारही दरीत कोसळली. जयंत अंड्रसकर मूळचे नागपूरचे असून, सात वर्षांपासून ते दिल्लीत स्थायिक झाले होते. त्यांचे वृद्ध आईवडील, भाऊ आणि विवाहित बहीण नागपुरातच राहते. ओळख पटलेला आणखी एक मृतदेह मुख्तार अहमद या स्थानिक नागरिकाचा असल्याचेही पोलिसांनी सांगितले. या तारेवरून एकावेळी चार केबल कार ये-जा करत असतात व त्यांचा प्रवास परस्परांच्या संतुलनावर अवलंबून असतो. झाडामुळे एक केबल कार खाली पडल्याने इतर तीन केबल कारही उंचावर लटकत जागीच अडकल्या. त्यातील लोकांना सुखरूपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न काळोख पडेपर्यंत सुरू होते.गोंडोला राइड गुलमर्ग-गोंडोला रोप-वे प्रवाशांना व सामानाला समुद्रसपाटीपासून १३,७८० फूट उंचीपर्यंत घेऊन जातो. तासाला ६०० प्रवाशांची ने-आण करण्याची त्याची क्षमता आहे.
केबल कार कोसळून नागपूरच्या चौघांसह सात जणांचा मृत्यू
By admin | Published: June 26, 2017 1:46 AM