विजयगोपाल (वर्धा) : गिट्टी खदानच्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात कपडे धुण्यासाठी गेलेल्या तीन मुलींचा बुडून अंत झाल्याची घटना देवळी तालुक्यातील आगरगावात रविवारी सकाळी घडली. सुदैवाने त्यांच्यासोबतच्या तिघींना वाचविण्यात यश आले. तसेच राज्यभरात विविध ठिकाणी रविवारी अन्य चार जणांचा बुडून मृत्यू झाला.अंजली हिरणसिंग भोसले (१८), रोहिणी सुइंदर चव्हाण (१६) आणि तोरणा नज्जूराव चव्हाण (१४) अशी वर्ध्यातील मृतांची, तर दीक्षा प्रदीप पवार, वैशाली बंडूसिंग पवार आणि आशिकला नगीनराम पवार अशी बचावलेल्या मुलींची नावे आहेत. अंजली ही इयत्ता दहावीची, रोहिणी ही आठवीची, तर तोरणा ही सहावीची विद्यार्थिनी होती.देवळीतील पारधी बेड्यावरील सहा मुली रविवारी सकाळी गिट्टी खदान परिसरात असलेल्या खड्ड्यामध्ये कपडे धुण्याकरिता गेल्या होत्या. दरम्यान, रोहिणीचा पाय घसरल्याने ती पाण्यात पडली. तिला वाचविण्यासाठी अन्य मुलीही पाण्यात उतरल्या; पण खड्डा खोल असल्याने त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. रोहिणीला वाचविण्याच्या प्रयत्नात अंजली आणि तोरणा यांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही बाब रस्त्याने जात असलेल्या राजू सदाशिव मेंढेकार (२९) यांच्या लक्षात आल्याने त्यांनी दीक्षा, वैशाली आणि आशिकला या तिघींचे प्राण वाचविले. (प्रतिनिधी)अन्य ठिकाणी चौघे बुडालेजळगाव जिल्ह्णात एक तरुणाचा धरणाच्या पाण्यात, तर दुसऱ्याचा नदीत बुडून मृत्यू झाला. शुभम आधार पाटील (१६ ) आणि शेख अरमान शेख सईद (१६) अशी मृतांची नावे आहेत. तळोदा येथील दोन सख्ख्या भावांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाला, तर दुसरा बेपत्ता झाला आहे. राहुल देविदास पाटील (२५) असे यातील मृताचे नाव असून विशाल अद्याप बेपत्ता आहे. दरम्यान, हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील रामसमुद्र तलावात मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या आक्रम अहेमद पठाण (१९, रा. रहीम चौक, औंढा) याचाही रविवारी सायंकाळी बुडून मृत्यू झाला.
राज्यभरात सात जणांचा बुडून मृत्यू
By admin | Published: July 25, 2016 5:16 AM