पंकज रोडेकर,
ठाणे- कौटुंबिक कलह, आजारपण असो वा प्रेमप्रकरण, याच कारणांतून नागरिकांच्या रक्षणासाठी उभा असणारा पोलीसही आत्महत्या किंवा आत्महत्येचा प्रयत्न करीत आहे. अशा प्रकारे मागील तीन वर्षांत ठाणे शहर, मुंबई तसेच रेल्वे पोलीस दलातील दोन महिला कर्मचाऱ्यांसह सात जणांनी ठाण्यात आत्महत्या केली आहे. या घटनांमध्ये प्रामुख्याने स्वसंरक्षणार्थ दिलेल्या रायफल, रिव्हॉल्व्हर या शस्त्रांचा वापर झाला आहे. शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात गेल्या साडेपाच वर्षांत दोन हजारांहून अधिक जणांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याचे पोलीस आकडेवारी सांगते. यामध्ये विविध कारणास्तव आत्महत्या करणाऱ्यांमध्ये महिलांपेक्षा पुरुषांचे प्रमाण लक्षणीय आहे. या आत्महत्या त्यांना आलेल्या नैराश्येतून करीत असल्याचे बोलले जाते. बुधवारी रात्री तोच ठाणे शहर पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल सागर माळूजकर याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने त्यांच्या खांद्याला गोळी लागल्याने ते बचावले असले तरी त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील परिमंडळ-१ आणि ५ या दोन परिमंडळांत २०१३, २०१४ या वर्षांत ठाणे, मुंबई आणि रेल्वे पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ६ पोलिसांनी टोकाची भूमिका घेऊन आपली जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेऊन आत्महत्या केली आहे. या घडलेल्या घटनांमध्ये कुटुंबांसह हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेले मुंबई पोलीस दलातील दहशतवादविरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त संजय बॅनर्जी यांनीही त्यांच्या खाजगी रिव्हॉल्व्हरने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. रोड अपघातात पाय गमावणारे ठाणे शहर पोलीस दलातील पोलीस हवालदार भरत थोरात (५१) यांनी वर्तकनगर येथे स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्या केली. शहर मुख्यालयातील पोलीस टिपू सुलतान बालेखान मुल्लाने स्वत:वर पेट्रोल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या केली. नौपाड्याचे पोलीस अच्युत शिंदे यांनी आजाराला कंटाळून गावी आत्महत्या केली. तत्पूर्वी, कळव्यातही अर्चना हिवरे या महिला कर्मचाऱ्याने रॉकेल ओतून पेटवून घेतले. तर, ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यातील वैशाली पिंगट यांनीही पोलीस ठाण्यातच ९ एमएम पिस्टलने स्वत:वर गोळी झाडून घेतली होती. तसेच शहर पोलीस आयुक्तालयाच्या नव्या मुख्यालयात रात्रपाळीला असलेल्या कॉन्स्टेबल दिलीप सिंगनवार (२८) याने एसएलआरमधून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती सूत्रांनी दिली.>प्रकृती स्थिर: बुधवारी रात्री स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या ठाणे शहर पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल सागर माळूजकर याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलीस दलातील सूत्रांनी दिली.>मोकळेपणाने चर्चा केल्यास तणाव होतील दूरकाही मानसोपचारतज्ज्ञांनी बोलताना, प्रत्येकाला ताणतणाव असतो. त्याचा अतिरेक झाल्याने एखादा टोकाची भूमिका घेण्याची शक्यता असते. त्यामुळे अगदी लहानातले लहान तणावाचे विषय मनात न ठेवता दुसऱ्यांशी मनमोकळेपणाने चर्चा करून ते दूर करावेत आणि या तणावातून मार्ग काढणे वेळीच गरजेचे असल्याचे सांगितले.