लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कमी पेट्रोल देऊन ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या पेट्रोल पंपांवर कारवाई करण्यास ठाणे पोलिसांची सात पथके वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये रवाना झाली आहेत. त्यामुळे सील ठोकलेल्या पेट्रोल पंपांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.वाहनांमध्ये इंधन भरणाऱ्या डिन्स्पेन्सिंग युनिटमध्ये इलेक्ट्रॉनिक चिपद्वारे हेराफेरी करणाऱ्या पेट्रोल पंपांविरुद्ध ठाणे पोलिसांनी केलेल्या कारवाईत आतापर्यंत १३ पंपांना सील ठोकण्यात आले आहे. कारवाईसाठी पोलिसांची एकूण सात पथके सध्या कार्यरत आहेत. ही पथके रायगड, नवी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूरकडे रवाना झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, पेट्रोल पंपांवरील फसवणुकीबाबत काही जागरूक नागरिक पेट्रोलियम कंपन्यांच्या तक्रार निवारण कक्षाकडे तक्रारी करीत असतात. आता ठाणे पोलिसांनी कारवाईला सुरू करताच या कंपन्या तक्रारदारांशी संपर्क साधून त्यांच्या तक्रारींचे निरसन करीत आहेत. दरम्यान, पोलिसांच्या कारवाईचे ग्राहकांकडून स्वागत होत आहे. कारवाईदरम्यान ग्राहक त्यांच्या तक्रारी पोलिसांकडे करतात. अनेक नागरिक पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून कारवाईबद्दल पोलिसांचे अभिनंदन करीत आहेत.
कारवाईसाठी सात पथके रवाना
By admin | Published: June 23, 2017 3:41 AM