पुणे: पुण्यातील येवलेवाडी येथील एनएमसी व्हेज आॅइल्स अॅन्ड केक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर छापा टाकून आरोग्यासाठी धोकादायक असलेले सुमारे ७ हजार १६३ किलो भेसळयुक्त मोहरी तेलाचा साठा अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांनी शुक्रवारी दुपारी जप्त केला. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने भेसळयुक्त तेल, मिठाई व अन्य सर्वच प्रकारच्या कारवाई सुरू केल्या आहेत.अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने येवलेवाडी येथील एनएमसी व्हेज आॅइल्स अॅन्ड केक्स प्रायव्हेट लिमिटेड छापा टाकला असता अत्यंत अस्वच्छ व आरोग्यासाठी धोकादायक वातावरणामध्ये मोहरी तेलाचे पॅकिंग सुरु असल्याचे आढळून आले. तसेच जुन्या लेबलवर स्टीकर चिकटवून मुदत संपलेले खाद्यतेलाच्या बाटल्यांनाच नवीन लेबल लावला जात असल्याचे आढळून आले. भेसळीच्या संशयावरून ४ नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. यामध्ये २ लाख ३८ हजार २०० रुपयांच्या १ लिटरच्या ३ हजार १७६ बाटल्या, २ लाख ४० हजार ८६४ रुपयांच्या अर्धा लिटरच्या ६ हजार १७६ बाटल्या, ६७ हजार ८१५ रुपयांचे ५ लिटरचे १७६ कॅन व ५४ हजार ६६ रुपयांचे १५ किलोचे ४९ डबे मोहरी तेलाचा साठा जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या साठ्याची एकूण किंमत ६ लाख ९४५ रुपये एवढी आहे.भेसळयुक्त तेलाचे साठे तापासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. या नमुन्याचे विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सहायक आयुक्त संपत देशमुख यांनी सांगितले.
मोहरीच्या तेलाचा सात हजार किलो भेसळयुक्त साठा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2017 6:26 PM