सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यात मागील तीन महिन्यांपासून आॅनलाइन सात-बारा उताऱ्याचा बोजवारा उडाला आहे. ८ फेबु्रवारीपासून खरेदी-विक्रीच्या नोंदी सात-बारा उताऱ्यावर लागत नसल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाच्या कारभारामध्ये एकमत नसल्याने आॅनलाइन सात-बारा उताऱ्याचा बोजवारा उडाला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.अद्ययावत आॅनलाइन सात-बारा काही निघेना आणि गावकामगार तलाठी काही नोंद घेईना, अशा द्विधा मन:स्थितीत नागरिक अडकले आहेत. ८ फेब्रुवारी २०१६ पासून प्रशासनाने हस्तलिखित सात-बारा उतारे व आठ ‘अ’ देऊ नयेत, ते आॅनलाइन सात-बारा उतारे द्यावेत, असे सक्त आदेश तालुक्यातील सर्वच तलाठी कार्यालयांना देण्यात आले होते. त्यामुळे मागील तीन महिन्यांपासून खरेदी-विक्रीचे व्यवहार केले आहेत अशा नागरिकांची नावे अजूनही सात-बारा उताऱ्यावर लागली नाहीत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची जमीन खरेदी केली आहे, तो शेतकरी त्या जमिनीची दुसऱ्यांदा विक्री करतो की काय? आणि आपल्याला कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागतात का? अशी धास्ती जमीन खरेदीदारांनी घेतली आहे. तसेच सध्या तलाठी कार्यालयातून हस्तलिखित सात-बारा उतारे मिळत आहेत. मात्र काढलेल्या तारखेपासून कोणतेही कर्ज काढण्यासाठी तीन महिन्यांचीच मुदत असते.मात्र सात-बारा देताना गावकामगार तलाठी सातबारा उताऱ्यावर ७ फेबु्रवारी २०१६ ही तारीख टाकून देतो. त्यामुळे त्या सात-बारा उताऱ्याची तीन महिन्यांची मुदत संपते. परिणामी तो सात-बारा कुठल्याही बँॅकेत कर्ज प्रकरणासाठी गृहीत धरला जात नाही. तसेच तालुक्यात आतापर्यंत हस्तलिखित सात-बारा उतारे बंद केल्यापासून जवळपास शेकडो खरेदी-विक्रीचे व्यवहार झालेले आहेत. मात्र प्रशासनाच्या आॅनलाइन सात-बारा उताऱ्याच्या घोळात हे शेकडो व्यवहार अडकून पडले आहेत. त्यामुळे नागरिकांचा लाखो रुपयांचा व्यवहार अडकून पडला आहे. सध्या आॅनलाइन सात-बारा उतारे आणि हस्तलिखित सात-बारा उतारे यामध्ये बरीच तफावत असून त्यामुळे दस्त होत आहे. मात्र नोंदी अडकून पडल्या आहेत.(वार्ताहर)
आॅनलाइन सात-बारा उतारे तीन महिन्यांपासून बंद
By admin | Published: May 19, 2016 1:51 AM