मुंबई : हृदयशस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या स्टेंट, कॅथेटर, बलुन्स आदी उपकरणांसाठी अवाजवी किंमत आकारणाऱ्या रुग्णालय आणि व्यक्तींच्या विरोधात अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात येणार असून, त्यासाठी सात वर्षे कारावासाच्या शिक्षेची तरतूद असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली.स्टेंटच्या दहापट जास्त किमती लावून गरीब रुग्णांची लूट केली जात असल्याबाबतची लक्षवेधी सूचना काँग्रेस सदस्य संजय दत्त यांनी मांडली होती. यावरील चर्चेला उत्तर देताना मंत्री बापट म्हणाले की, रुग्णालयांनी एमआरपीनुसारच स्टेंट विकायला हवे. वैधमापन शास्त्र अधिनियमानुसार मुंबईतील आठ मोठ्या रुग्णालयांवर धाडी टाकण्यात आल्या. पूर्वी देशी आणि आयात केलेल्या स्टेंटची किंमत दोन ते अडीच लाख रुपये इतकी आकारण्यात येत असे; मात्र आता २९ हजारपुढे स्टेंटची किंमत लावता येणार नाही, असे मंत्र्यांनी स्पष्ट केल. सध्या सरकारकडे पुरेसा कर्मचारीवर्ग नसल्याने सर्व रुग्णालयांत जाऊन तपासणी करता येत नसल्याबाबतची हतबलता राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केली होती. यावर विरोधकांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर कायद्याचे हात बळकट होत आहेत. या कामात निवृत्त व्यक्ती, स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांना सामावून घेतले जाईल, असा मानस बापट यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)नामांकित रुग्णालयांवर खटले दाखललीलावती, फोर्टिस, ब्रीच कॅन्डी, कोकिळाबेन अंबानी रुग्णालय, ग्लोबल, हिरानंदानी, एशियन हार्ट आणि रिलायन्स फाउंडेशन आदी रुग्णालयांवर खटले दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय ज्या रुग्णांनी यापूर्वी उपचार घेतले आहेत त्यांच्या जुन्या फायली काढून बिले तपासली जात आहेत. स्टेंटची मूळ किंमत आणि रुग्णालयाने आकारलेली किंमत याची तपासणी केली जात आहे. जिथे तफावत असेल त्या रुग्णालयांकडून तफावतीची रक्कम वसूल करण्यात येत आहे.
अवाजवी दरात स्टेंट विकणाऱ्यांना सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2017 1:55 AM