मुंबई : कुलाबा-वांद्रे-अंधेरी(स्विप्झ) या मार्गावरील मेट्रो-३ चे भूमीपूजन राज्य सरकारकडून मोठ्या धुमधडाक्यात करण्यात आले असलेतरी त्याचे काम पूर्ण होण्यासाठी तब्बल ७ वर्षे म्हणजे २०२१ साल उजाडावे लागणार आहे. ३२.५ किलोमीटर लांब अंतराच्या या भूयारी मार्गाच्या कामासाठी १४ कंपन्यांनी तयारी दर्शविली असून प्रत्यक्ष डिसेंबरपासून कामाला सुरवात करण्याचे नियोजन केले आहे. या मार्गावर एकुण २७ स्टेशन असून भूमिगत मार्गावरुन धावणाऱ्या या प्रकल्पासाठी २३ हजार १३६ कोटीचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी ५७ टक्के म्हणजे १३ हजार २३५ कोटी रक्कम जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्था (जायका) कर्जस्वरुपात देईल. उर्वरित रक्कम ही केंद्र, राज्य व एमएमआरडीएकडून उपलब्ध केली जाईल. या प्रकल्पामुळे मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, मेट्रो मार्ग-१, मार्ग-२, मोनो रेल्वेची काही स्थानके जोडली जातील. नियोजित २७ स्थानकामध्ये कफ परेड, विधानभवन, चर्चगेट मेट्रो, हुतात्मा चौक, सीएसटी मेट्रो, कालबादेवी, गिरगाव, ग्रॅण्ट रोड मेट्रो, मुंबई सेट्रल मेट्रो, महालक्ष्मी मेट्रो, सायन्स मुझियम, बीकेसी, अंधेरी, एमआयडीसी, स्वीप्झ या ठिकाणांचा समावेश आहे.(प्रतिनिधी)
सात वर्षांनंतर मेट्रो-३ प्रत्यक्षात
By admin | Published: August 27, 2014 4:41 AM