रमाकांत पाटील - नंदुरबारज्याच्या घरापर्यंत साधा रस्ता नाही...वीज नाही...नळाचे पाणी नाही...घरावर छत नाही...दूरध्वनी आणि इतर सुविधा तर लांबचीच गोष्ट. अशा प्रतिकुल परिस्थितीत राहूनही जिद्द आणि चिकाटीच्या बळावर बर्डी (ता. अक्कलकुवा) येथील किसन पाडवी या धावपटूने आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक पटकविले आहे. एवढेच नव्हे तर पुढील वर्षी होणाऱ्या आॅलिम्पिक स्पर्धेत कुठल्याही परिस्थितीत पात्र ठरण्याचा त्याने निश्चय केला आहे. अतिदुर्गम भागातील या आदिवासी तरुणाच्या यशाबाबत मात्र राज्य शासन अद्यापही अंधारातच आहे. सरकारकडून किसनच्या कामगिरीची अजून योग्य ती दखल घेतलेली नाही.सातपुड्यातील बर्डी हे जेमतेम सात-आठशे लोकसंख्येचे गाव. सात पाड्यात विभागलेले. त्यातीलच भगतपाड्यातील एका झोपडीत किसन नरसी तडवी राहतो. किसन सध्या नाशिकला अकरावीचे शिक्षण घेत असून त्याचे प्रशिक्षणही सुरू आहे. त्याचे वडील नरसी टेट्या तडवी आणि आई गेनाबाई नरसी तडवी येथेच वास्तव्यास आहेत. त्याच्या घरापर्यंत पोहचण्यासाठी दमछाक करावी लागते. अज्ञान आणि दारिद्य्र नशिबी आलेल्या या कुटुंबापर्यंत मुलाच्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या यशाची बातमी आठवडाभरानंतर पोहोचते. मात्र या स्थितीतही जिद्द, चिकाटी आणि परिश्रमातून त्याने आकाशाला गवसणी घालण्याचे ध्येय ठरविले असून त्याला यशही मिळत आहे. दोहा येथील आशियाई युथ स्पर्धेत तीन हजार मिटर धावण्याच्या शर्यतीत त्याने सुवर्णपदक पटकावले आहे. किसन सध्या जुलै महिन्यात कोलंबियात होणाऱ्या आशियाई स्पर्धेची तयारी करत आहे. त्यानंतर तो चीनमध्ये होणाऱ्या स्पर्धेतही सहभागी होणार आहे. पुढील वर्षी आॅलिम्पिक होत असून त्यात पात्र ठरण्याचा चंग त्याने बांधला असून त्यासाठी तो अहोरात्र परिश्रम घेत आहे. त्याचे प्रशिक्षक विजेंदर सिंग त्याला मार्गदर्शन करत आहे. च्किसनच्या यशाने त्याचे वडील नरसी तडवी आणि आई गेनाबाई तडवी यांना खूप आनंद झाला आहे. मुलाने राज्यात, देशात आणि जगात नाव कमविले याचा आम्हाला खूप खूप आनंद झाला आहे. तो अजून पुढे जाईल, याचा आम्हाला विश्वास आहे. आम्ही त्याच्या शिक्षणासाठी जे कष्ट केले, मोलमजुरी केली त्याचे चीज झाल्याचे त्यांनी सांगितले. च्किसनचे आई-वडील आॅलिम्पिक, आशियाई स्पर्धेबाबत अनभिज्ञ आहेत. केवळ जागतिक पातळीवर मुलाने नाव कमविले याची त्यांना माहिती आहे. ही माहितीदेखील त्यांच्यापर्यंत तब्बल आठवडाभरानंतर पोहोचली. यासंदर्भात प्रशिक्षक विजेंदर सिंग यांनी फोनने गावापर्यंत माहिती दिली. ती त्यांना आठवडाभराने मिळालीच्किसनच्या यशाची राज्य शासनाने अजूनही योग्य ती दखल घेतलेली नाही. शासनाने यापूर्वी धावपटूंना तत्काळ मदत देवून त्यांचा गौरव केला होता. पण किसन मात्र त्याबाबत दुर्दैवी ठरला आहे. दोहाहून परतल्यानंतर दिल्ली विमानतळावर त्याचे भव्य स्वागत झाले. पण मुंबई विमानतळावर त्याच्या स्वागतासाठी शासनाचा कुणीही प्रतिनिधी नव्हता.
सातपुड्याच्या किसनला लागलेत आॅलिम्पिकचे वेध !
By admin | Published: May 24, 2015 1:47 AM