विशाल शिर्के / पुणेराज्यातील तब्बल १७ हजारांहून अधिक जलस्त्रोत दूषित असल्याची माहिती समोर आली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्हे यात आघाडीवर आहेत. नायट्रेट, फ्लोराईड, आयर्न यांसारख्या रासायनिक घटकांबरोबरच ई-कोलाई आणि कोलिफॉर्मंसारखे आजार पसरविणाऱ्या जीवाणूंचे प्रमाण यात जास्त असल्याचे दिसून आले आहे.केंद्रीय पेय जल विभागाच्या २०१६-१७चा अहवालावरुन ही बाब स्पष्ट झाली आहे. शेतीमध्ये वापरण्यात येत असलेल्या रासायनिक खतांमुळे नायट्रेट जमिनीत पाझरुन भूजल आणि इतर जलस्त्रोत दूषित करीत असल्याचे समोर आले आहे. राज्यातील प्रयोगशाळेत तब्बल पावणेदोन लाख स्त्रोतांची तपासणी करण्यात आली. त्यातील तब्बल १६ हजार १९९ जलस्त्रोतांमध्ये नायट्रेट आढळून आले आहे. ४०८ आणि ८१० ठिकाणच्या स्त्रोतांमध्ये अनुक्रमे फ्लोराईड, आयर्न यांचे प्रमाण आढळून आले. ई-कोलाई या जीवाणूचे प्रमाण तब्बल ९ हजार ५०४, तर कोलिफॉर्म या जीवाणूचे प्रमाणही तब्बल १७ हजार १३० स्त्रोतांमध्ये आढळून आले आहे. नायट्रेटसह, फ्लोराईड, आयर्न अशी एकाहून अधिक अशुद्धीतले १ हजार ६९५ जलस्त्रोत आहेत. यात भूजल, विहिरी, नदी, झरे, बंद नळ पाईप योजना अशा सर्व प्रकारच्या पेयजल स्त्रोतांचा समावेश आहे. शेतीत रासायिनक खतांच्या वापरामुळे नायट्रेटसारखा घटक आढळून येत असल्याचे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे संचालक सुनील पाटील म्हणाले.
सतरा हजार जलस्रोत दूषित
By admin | Published: April 01, 2017 3:38 AM