मुंबई : शालेय शिक्षणातून विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान मिळते, पण दैनंदिन जीवनाशी निगडित ज्ञानाचे प्रमाण अत्यल्प आहे. याचबरोबरीने शिक्षणाला अनुभवांची जोड दिली जाणार आहे. २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात इयत्ता सातवी आणि नववीचा नवीन अभ्यासक्रम हा ज्ञानरचनावादावर आधारित असणार आहे. ज्ञानार्जनाबरोबरीने स्पर्धेत उतरण्यासाठी अभ्यास केला जातो. त्यामुळे अभ्यासक्रमातील बदलांमध्ये बदलत्या परीक्षा पद्धतींशी सांगड घालण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षात इयत्ता सातवी आणि नववीचा अभ्यासक्रम बदलण्यात येणार आहे. त्यानंतर, २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात आठवी व दहावीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडून देण्यात आली आहे. मंडळातर्फे पाठ्यपुस्तक विक्रेते, शैक्षणिक संस्थांनी आवश्यकतेनुसार पुस्तकांची खरेदी करण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. राज्य अभ्यासक्रम आराखडा २०१० नुसार या पाठ्यपुस्तकांच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात येईल. आत्तापर्यंत इयत्ता सहावीपर्यंतच्या पाठ्यपुस्तकांमध्ये बदल करण्यात आला आहे. पूर्वीच्या अभ्यासक्रम बदलण्याच्या रचनेत बदल करण्यात आला आहे. आता पहिली ते बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमाची निर्मिती एकाच मंडळाकडून करण्यात येणार आहे. या आधी विद्या परिषदेकडून पहिली ते आठवीच्या अभ्यासक्रमाची आखणी केली जात होती, तर बालभारतीतर्फे निर्मिती केली जात होती. प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम २०१२ नुसार, सुधारित बदलाच्या अभ्यासक्रमानुसार इयत्ता तिसरी परिसर अभ्यास (जिल्हा भूगोल) आणि इयत्ता चौथी व पाचवी परिसर अभ्यास भाग १, २ ही पाठ्यपुस्तके शैक्षणिक वर्ष २०१८-१९ (जून २०१८) मध्ये बदलणे अपेक्षित असल्याचे मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
सातवी, नववीचा अभ्यासक्रम बदलणार
By admin | Published: January 09, 2017 5:05 AM