जळगाव- चाळीसगाव परिसरात बिबटयाचा धुमाकूळ सुरुच आहे. बुधवारी बिबट्याने कुणाल प्रकाश अहिरे (७) या पहिलीत जाणाºया बालकाला उचलून नेऊन ठार केले. साकूर- देवघट शिवारात बुधवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. बिबट्याचा हा सातवा बळी आहे. दुसरीकडे उपखेड येथे बिबट्याने दुपारी केलेल्या हल्ल्यात एक महिला जखमी झाली. एकाच दिवशी घडलेल्या या दोन घटनांमुळे सर्वांचा थरकाप उडाला आहे.
साकूर- देवघट हे मालेगाव तालुक्यात असले तरी चाळीसगाव- नाशिक हद्दीवर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रतन शंकर बागूल यांचे साकूर शिवारात शेत आहे. शेतात बांधलेल्या झोपडीत त्यांचा नातू (मुलीचा मुलगा) कुणाल अहिरे हा झोपण्यासाठी जात होता. त्याचवेळी बिबट्याने त्याच्यावर झडप मारुन त्याला ओढत नेले. आजोबा रतन बागूल यांनी शोधाशोध केली पण कुणाल कुठेही आढळला नाही. त्यामुळे त्यांना संशय आला. या घटनेपूर्वीच बिबट्याने जवळच असलेल्या सेवानगर वस्तीत मेंढ्यांवर हल्ला केला होता. त्यामुळे तिथले मेंढपाळ आणि वनविभागाचे कर्मचारी बिबट्याला शोधत साकूरपर्यंत आले, त्यावेळी बागूल यांनी नातवाबद्दल सांगितले असता त्यांनी शोध घेतला. त्यावेळी रात्री १०.५० वाजेच्या सुमारास कुणालचे धड बाजूच्याच शेतात आढळून आले. दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून मेहुणबारे पोलीस आणि वन विभागाचे कर्मचारी लागलीच साकूर शिवारात पोहचले होते.
बिबट्याच्याा हल्ल्यात महिला जखमी उपखेड शिवारातील शेतात कापूस वेचत असताना बिबट्याने गायत्री सुरेश पाटील (३८) या महिलेवर हल्ला करुन जखमी केले. महिला व पुरुषांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने पळ काढला. बुधवारी दुपारी साडेतीन वाजता ही घटना घडली.